हिंदूंनो सावधान! दांभिक पुरोगाम्यांमुळे देश इस्लामिक राष्ट्राकडे झुकतोय, भाजप नेत्याचे ट्वीट

1407

भारतीय जनता पक्षाचे खासदार अनंत कुमार हेगडे (BJP MP Ananth Kumar Hegde) हे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. मागे एकदा लष्करी जवानांबाबत टिप्पणी केल्यामुळे हेगडे यांच्यावर टीकाही झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त ट्वीट केले आहे.

दिल्लीमध्ये नागरिकता सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनात हिंसाचार उफळला. या हिंसाचारामध्ये चाळीसपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यावरून राजकारण सुरू असतानाच अनंत कुमार हेगडे यांनी वादग्रस्त ट्वीट केले. दांभिक पुरोगाम्यांमुळे देश इस्लामिक राष्ट्राकडे झुकतोय, अशा आशयाचा एक व्हिडीओ त्यांनी ट्वीट केला असून हिंदूंना सावधान राहण्याचा सल्लाही दिला आहे.

अनंत कुमार हेगडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये इस्लामच्या विस्ताराबाबत सांगण्यात आले आहे. सीरियामध्ये पूर्वी ख्रिश्चन धर्म प्रमुख होता, परंतु आता हा देश इस्लाम राष्ट्र झाला आहे, इराणमध्ये पारसी धर्म प्रमुख होता, परंतु आता इराणही इस्लाम राष्ट्र झाले आहे. याप्रमाणे पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही हिंदू धर्म प्रमुख होता आणि आता ही दोन्ही राष्ट्र इस्लाम राष्ट्र झाली आहेत. अफगाणिस्तानमध्येही हिंदू आणि बौद्ध धर्माचे पालन केले जात होते, मात्र आता हा देशही इस्लाम राष्ट्र झालेला आहे. दांभिक धर्मनिरपेक्षतेमुळे मूळ रहिवासी फक्त आपला जीवच गमावत नाहीयेत, तर आपले जमिन आणि घरंही गमावत आहेत, असे हेगडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नमूद केले आहे.

सीरिया, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश ही राष्ट्र आता इस्लाम राष्ट्र झाली आहेत. आता त्यांचे लक्ष्य हिंदुस्थानकडे आहे का असा सवाल उपस्थित करत अनंत कुमार हेगडे हिंदूंना सावध होण्याचे सांगतात आणि उशिर होण्याआधी दांभिक पुरोगामीत्वावर विचार करण्याचाही सल्ला देतात. दरम्यान, त्यांच्या या ट्वीटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

याआधीही केली वादग्रस्त विधानं
लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले होते आणि जाणवेही दाखवले होते. यावर मुस्लिम वडील आणि ख्रिश्चन आईचा मुलगा ब्राह्मण कसा असू शकतो, असा सवाल हेगडे यांनी उपस्थित केला होता. तसेच महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य संग्रामाचा ड्रामा इंग्रजांच्या सहमतीने केला गेला. त्या तथाकथित नेत्यांना पोलिसांनी एकदाही मारझोड केलेली नाही असेही विधान त्यांनी केले होते. यामुळे मोठा वाद उफळला होता.

मृतांचा आकडा 43 वर
दरम्यान, ईशान्य दिल्लीमध्ये उफळलेल्या दंगलीतील मृतांचा आकडा आता 42 वर पोहोचला आहे. आतापर्यंत या प्रकरणी चाळीसपेक्षा जास्त एफआयआर दाखल करण्यात आल्या असून 100 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या