
भाजप्रणीत सरकार असलेल्या राज्यांमध्ये सातत्याने विकासाची पोलखोल होत आहे. दिल्लीत कमरेहून अधिक पाणी साचले, तर गुजरातमध्येही हीच परिस्थिती दिसली. महिसागर नदीवरील पूल कोसळून तब्बल 20 जणांचा जीव गेला. असे असूनही भाजप खासदार, मंत्री ताळ्यावर येत नसल्याचेच दिसत आहे. मध्य प्रदेशात रस्त्याची मागणी करणाऱ्या महिलेला डिलिव्हरीची तारीख सांगा, उचलून रुग्णालयात दाखल करू आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे, असा अजब सल्ला दिला.
मध्य प्रदेशातील सीधी जिह्यात रस्ता बनवण्यासाठी सोशल मीडियावर लीला साहू या महिलेने व्हीडियोच्या माध्यमातून सरकारला आवाहन केले. यावर भाजपा खासदार राजेश मिश्रा यांनी या महिलेलाच अजब सल्ला दिला. आता हाच व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढायला सुरुवात केली आहे.
म्हणे रस्ते आम्ही नाही, अभियंते बनवतात
रस्ते आम्ही नाही, अभियंते बनवतात असे मिश्रा म्हणाले. सोशल मीडियावर व्हीडिओ जारी करून रस्ता बनवण्याचे आवाहन करणारी लीला साहू गर्भवती असून सीधी जिह्यातील खड्डी खुर्द गावातील 8 गर्भवती महिलांनी खराब रस्त्याविरोधात लीला साहू यांच्यासोबत आघाडी उघडली आहे.