
स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सुदामा’ म्हणवून घेणारे भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामस्वरूप शर्मा यांनी बुधवारी दिल्लीतील खासदार निवासात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शर्मा हे हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आले होते. सकाळी आपल्या निवासस्थानात शर्मा हे गळफास लावलेल्या अवस्थेत सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या निधनामुळे आज नवी दिल्लीत होणारी भाजप संसदीय दलाची बैठक रद्द करण्यात आली.
आरएसएस आणि भाजपमध्ये अनेक वर्षे सक्रिय असलेले खासदार रामस्वरूप शर्मा यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यांची अँजिओप्लास्टी करून त्यांच्या शरीरात चार स्टेंट टाकण्यात आल्या होत्या. आपल्या या आजारामुळेच ते अनेक महिने तणावाखाली असल्याचे बोलले जात आहे. एक उत्तम कबड्डीपटू असलेले रामस्वरूप यांनी नॅशनल हायड्रोपॉवर कॉर्पोरेशनमध्ये काही काळ नोकरीही केली. त्यानंतर ते हिमाचल प्रदेशातील चंबा येथे आरएसएस आणि भाजपच्या संपर्कात आले. 2014 मध्ये शर्मा यांनी मंडी लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांना पराभूत केले होते. त्यानंतर ते 2019 मध्ये पुन्हा भाजपच्या तिकिटावर मंडी मतदारसंघातून संसदेवर गेले होते.




























































