
भाजप खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिकेवर एकमेकांचे छायाचित्र न छापल्याने भाजपअंतर्गत असलेला खासदार विरुद्ध आमदार गटातील वाद अद्यापि मिटला नसल्याचे मानले जात आहे.
गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत विखे व राजळे यांनी एकमेकांना मोठी साथ देत ‘हम एक हैं’चा नारा दिला. मात्र, काळाच्या ओघात हा नारा क्षीण होऊन आता तालुक्यात विखे विरुद्ध राजळे असा संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचा एक भाग म्हणून चार महिन्यांपूर्वी खासदार सुजय विखे यांनी तालुक्यातील रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रामीण भागासाठी एक व शहरासाठी एक अशा दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले.
कोरोनाकाळात या रुग्णवाहिकेचा रुग्णांना मोठा फायदा झाला. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पगडा असल्याने विखे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी या साखळीतील सर्वच नेत्यांचे फोटो छापले. मात्र, या मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांचे छायाचित्र मात्र छापले नाही. राजळे यांचे छायाचित्र न छापल्याने राजळे यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. विखे यांनी या रुग्णवाहिकेचे सर्वाधिकार हे आपले खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड व अजय रक्ताटे यांच्याकडे दिले होते.
मागील आठवडय़ात मोनिका राजळे यांनीही आपल्या स्थानिक विकास निधीतून दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. यांतील एक रुग्णवाहिका पाथर्डी, तर एक रुग्णवाहिका शेवगाव तालुक्यासाठी दिली. या रुग्णवाहिकेवर राजळे यांनीसुद्धा पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या महत्त्वाच्या सर्व नेत्यांची छायाचित्रे छापली. मात्र, खासदार विखे यांचे छायाचित्र न टाकता विखे यांना शह देण्याचे काम केल्याने हा विषय भाजप वर्तुळात चर्चेचा ठरला. राजळे यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिका या पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालय व शेवगाव येथील रुग्णालयाला देत त्याचे सर्वाधिकार हे या रुग्णालयांना दिले.
गेल्या अनेक दिवसांपासून विखे व राजळे हे एका व्यासपीठावर आले नसून, दोन्हीही गट स्वतःचे स्वतंत्र कार्यक्रम घेत असल्याने सध्या हा वाद टोकाला गेला असल्याचे मानले जात आहे. आगामी काळात पालिका, बाजार समिती, तर त्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक होणार असून, हा वाद असाच सुरू राहिला तर त्याची किंमत भाजपला मोजावी लागणार असल्याचे मानले जात आहे.




























































