
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
कामाच्या ठिकाणी महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचार, शोषणाविरोधात आवाज उठवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या #MeToo अभियानाने जोर पकडला आहे. हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूडसह प्रसारमाध्यमातील महिलांनी देखील या कॅम्पेनअंतर्गत आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली आहे. #MeToo हे कॅम्पेन महिलांना त्यांच्यावर झालेल्या, होणाऱ्या अत्याचाराविरोधात वाचा फोडण्याचे बळ देत असतानाच भाजप खासदार उदीत राज यांनी वादग्रस्त वक्तव्य करत या अभियानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
#MeToo ‘स्त्री’मधील अभिनेत्रीला निर्मात्याची जबर मारहाण, जबडा तोडला
उदीत राज यांनी ट्वीट करत या अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,’#MeToo हे कॅम्पेन आवश्यक आहे, परंतु एखाद्या व्यक्तीवर 10 वर्षानंतर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्याचा काय संबंध आहे? एवढ्या वर्षानंतर या प्रकरणाची सत्यता कशी पडताळून पाहिली जाणार? ज्या व्यक्तीवर खोटा आरोप लगावण्यात येतो त्याची समाजातील प्रतिष्ठा धुळीस मिळते, याबाबतही विचार करण्याची आवश्यकता आहे. ही एका चुकीच्या प्रथेची सुरुवात आहे.’

राज यांनी पुढील ट्वीटमध्ये म्हटले की, ‘हे कसे शक्य आहे की लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणारी मुलगी आपल्या पार्टनवर कधीही बलात्काराचा आरोप लगावून त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करते आणि त्याला तुरुंगात पाठवते. अशा प्रकारच्या घटना सध्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीसोबत होत आहेत.’ तसेच याचा ब्रॅकमेलिंगसाठी वापर होणार नाही हे कशावरून? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच एएनआय या वृत्तसंस्थेने उदीत राज यांच्या वक्तव्याचे एक ट्वीट केले आहे. यात भाजप खासदार म्हणतात की, ‘काही महिला दोन-चार लाख घेतात आणि पुरुषांवर आरोप लगावतात, त्यानंतर कोणत्यातरी दुसऱ्या पुरुषाची निवड करतात. मी मान्य करतो की पुरुषांच्या स्वभावात या गोष्टी असतात, परंतु महिला नेहमी बरोबर असतात का? याचा चुकीचा वापर केला जाऊ शकत नाही का?’ असा सवाल उपस्थित करत राज यांनी यामुळे पुरुषाच्या संपूर्ण आयुष्य खराब होते असे म्हटले आहे. दरम्यान, महिलांच्या #MeToo कॅम्पेनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजप खासदारावर नेटकऱ्यांनी हल्लाबोल केला आहे.





























































