
अमरावती महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपामध्ये भाजपने निष्ठावंतांऐवजी पैसे घेऊन आयारामांना तिकीट दिल्याने निष्ठावंत संतप्त झाले. भाजपच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकार्यांना कडक शब्दांत याचा जाब विचारला आणि त्यांना धारेवर धरेल. भाजपच्या कार्यकर्त्यांचा रोष पाहून भाजपच्या पदाधिकार्यांनी महापालिका झोन कार्यालयातून पळ काढला.
अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपच्या निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते संगम गुप्ता यांनी केला. हिंदुत्ववादी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ‘‘तुम्ही पैसे घेऊन उमेदवारी दिली’’ असा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी तसेच प्रदेश कार्यकारणी सदस्य जयंत डेहनकर यांच्यावर केला. ‘‘आम्ही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून आम्हाला अडवले. जे लोक पक्षात कधीही नव्हते त्यांना उमेदवारी तुम्ही पैसे घेऊन दिली,’’ अशा शब्दांत भाजपच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. हिंदुत्ववादी संघटना तसेच भाजपचे कार्यकर्ते या वेळी प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी भाजप पदाधिकार्यांना या वेळी धक्काबुक्कीदेखील केली. कार्यकर्त्यांचा रोष पाहता शिवराय कुलकर्णी, दिनेश सूर्यवंशी आणि जयंत डेहनकर या तिघांनी राजापेठ झोन कार्यालय परिसरातून अक्षरश: पळ काढला. या पदाधिकार्यांच्या मागे जात कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड शिवीगाळदेखील केली. उमेदवारी डावलण्यात आल्यामुळे भाजपच्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. आता भाजपचे दिवस संपले. आता आम्ही भाजपच्या सर्व पदाधिकार्यांना पाहून घेऊ असा इशारादेखील निष्ठावान कार्यकर्त्यांनी दिला.






























































