महापालिकेत शिवसेनेचा भाजपला धोबीपछाड

स्थायी समितीच्या बैठकीत बोलायची संधी देऊनही नाहक राजकारण करीत आंदोलनाची नौटंकी करणाऱया भाजपला शिवसेनेने चांगलाच धोबीपछाड दिला. शिवसेना नगरसेवकांनी भाजपच्या घोषणाबाजीला चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या मारलेल्या भाजप नगरसेवकांना माघार घ्यावी लागली. निवडणुकीच्या निकालांत सपाटून मार खाल्ल्यामुळेच भाजप सैरभैर झाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेवकांनी सुरुवातीपासूनच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी स्थायी समिती अध्यक्षांनी नियमित कामकाजानंतर हरकतीचा मुद्दा मांडण्यास सांगितले, मात्र नियमित कामकाजानंतरही भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हरकतीचा मुद्दा मांडला नाही. त्यामुळे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा मांडल्यानंतर सभा रीतसर संपल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी जाहीर केले.

यावेळी अध्यक्षांनी आपल्याला बोलू दिले नसल्याचे सांगत भाजप नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करीत स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. यावेळी खुद्द अध्यक्षांनी चर्चेसाठी बोलावूनही घोषणाबाजी करीत अध्यक्षांची वाटही अडवून धरण्याचा प्रयत्न केला.

मात्र यावेळी शिवसेना नगरसेवकांनीही आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करीत भाजपला माघार घेण्यास भाग पाडले. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेवक

प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, संजय घाडी, चंद्रशेखर वायंगणकर, विजयेंद्र शिंदे, परमेश्वर कदम, सुरेश पाटील, नगरसेविका राजुल पटेल, सुजाता पाटेकर, अरुंधती दुधवडकर यांच्यासह स्थापत्य समिती अध्यक्ष श्रीकांत शेटये,  किरण लांडगे आदी उपस्थित होते.

व्हायरल क्लिपच्या आडून भाजपचे कारस्थान

ई-टेंडर प्रक्रियेमुळे विकासकामांचा दर्जा राखला जात नसल्यामुळे पहिल्यासारखी सीडब्ल्यूसी पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणीही यशवंत जाधव यांनी केली. भाजपने कंत्राटदाराशी हातमिळवणी करून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी ‘व्हायरल क्लिप’ प्रकरणावरून राजकारण सुरू केल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले, मात्र शिवसेना अशी कारस्थाने हाणून पाडेल असा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेनेच्या माध्यमातून मुंबईत विकासकामांचा धडाका लावला जात असल्याने भाजपला पोटशूळ उठला आहे. पुठेही सत्तेत नसल्यामुळे भाजपला केवळ गोंधळ घालण्याचेच काम शिल्लक राहिल्याचा टोलाही यशवंत जाधव यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या