
सामना ऑनलाईन । गांधीनगर
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी शाह यांनी गांधीनगरमध्ये सभा घेऊन रोड शो केला.
Gandhinagar: BJP President Amit Shah files his nomination for Gandhinagar parliamentary constituency. #LokSabhaElections2019 #Gujarat pic.twitter.com/u4oMwnCk4K
— ANI (@ANI) March 30, 2019
गुजरातमधील गांधीनगर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाहा यांनी सभेला सुरुवात केली. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राम विलास पासवान, रेल्वे मंत्री पियुष गोयल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी देशाचं नेतृत्व कोण करणार या एकाच मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार आहे, असे सांगत संपूर्ण देशातून फक्त नरेंद्र मोदींचेच नाव ऐकू येत आहे असे अमित शाहा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच देश सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनाच देशाचे पंतप्रधान करण्यासाठी गुजरातमधील सर्व 26 जागांवर भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन अमित शाहा यांनी केले.


























































