
विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात झालेल्या पाडापाडीच्या राजकारणावरून भाजपमध्ये खदखद सुरू झाली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी विरोधी पक्षनेते, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील व त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत असंतोष उफाळून आलाय. माजी मंत्री राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या पराभवास विख पिता-पुत्रांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय समाधान होणार नसल्याचे म्हटले आहे. तर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चर्चेतून मार्ग निघेल, अशी मोजकीच प्रतिक्रिया व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे तसेच शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड यांचा पराभव झाल्यानंतर या सर्वांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधकांना मदत केल्याने पराभव झाल्याची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली होती. या पाश्र्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत नगर जिल्ह्याची निवडणूक आढावा बैठक मुंबईत बोलावण्यात आली होती.
विखे-पाटील काँग्रेसमधून भाजपमध्ये आले त्यावेळी जिल्ह्यात विधानसभेच्या सर्वच्या सर्व १२ जागा जिंकण्याचा निर्धार केला होता, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपच्या पदरात केवळ तीनच जागा पडल्या. त्यानंतर निष्ठावान विरुद्ध उपरे असा वाद नगरमध्ये उफाळून आला आहे. विखे-पाटील यांना पक्षात घेऊन काहीही फायदा झालेला नाही, उलट फटका बसला, असा थेट आरोप भाजपच्या पराभूत उमेदवारांनी बैठकीत केला. अखेर संघटनमंत्री पुराणिक बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अहवाल सादर करतील. त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे ठरवत बैठक आटोपती घेण्यात आली.
प्रत्येक पक्षात थोडीफार नाराजी असतेच. त्यामुळे चर्चेतून मार्ग निघेल. पक्षाला फायदा झाला की नाही त्याबद्दल वरिष्ठ सांगतील. आम्ही आमची बाजू फडणवीसांसमोर मांडली असून पक्षांतर्गत निर्णय जाहीर करायचे नसतात. – राधाकृष्ण विखे-पाटील
पक्षाला आम्ही आमच्या व्यथा आणि अनुभव सांगितले. दोन्ही बाजू ऐवूâन घेतल्या गेल्या. विजय पुराणिक यासंबंधी अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे. – राम शिंदे
विखे परतीच्या मार्गावर?
राधाकृष्ण विखे-पाटील हे यू-टर्न घेऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे कळते. याबाबत अधिवेशनकाळात नागपूरमध्ये काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व विखे-पाटील यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

























































