भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांच्या विरोधात महिलांचा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही मला मत देणार आहात की मुलगी? असे बेताल वक्तव्य उरण येथील भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महेश बालदी यांच्या वक्तव्यांविरोधात घोषणाबाजी करत दोनशे संतप्त महिलांनी उरण पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. तर आगरी-कोळी-कराडी संघर्ष सामाजिक संस्थेने बादली यांच्या अटकेची मागणी उरण पोलिसांकडे केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांनी दिली.

उरण विधानसभा मतदारसंघात आमदार मनोहर भोईर यांना शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपचे स्थानिक नेते तथा जेएनपीटीचे माजी विश्‍वस्त महेश बालदी यांनी बंडखोरी केली आहे. ‘बंडखोरी खपवून घेणार नाही’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही ते रिंगणात कायम आहेत. प्रचार करत आहेत. पक्षाच्या नावाचा वापरदेखील त्यांच्याकडून सर्रास सुरु आहे. भाजपची एक मोठी फळी त्यांच्या मागे आहे.

रसायनी, मोहपाडा परिसरात प्रचाराचा दरम्यान बोलताना मात्र बालदी यांची जीभ घसरली. माझी जात बघायला, तुम्ही मला मत देणार आहात की मुलगी? असा सवाल त्यांनी केला होता. आमच्या मुली काय रस्त्यावर आहेत का? असा प्रश्‍न विचारत हा व्हिडीओ उरण मतदार संघात जोरदार व्हायरल झाला आहे. त्यानंतर आगरी-कोळी-कराडी संघर्ष सामाजिक संस्थेने बादली यांच्या अटकेची मागणी उरण पोलिसांकडे केली लेखी तक्रार केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांनी दिली. तर महेश बालदी यांचे वक्तव्यांविरोधात संतप्त झालेल्या महिलांनी जोरदार घोषणाबाजी करीत उरण पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. वपोनि जगदीश कुलकर्णी यांची भेट घेऊन महिलांनी बादली यांच्या अटकेचीही मागणी केली आहे.