भाजप शासित जिल्हा परिषदेत 45 कोटीचा निधी पडून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव 

येथील जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नियोजनाअभावी जिल्हा विकास व नियोजन समितीकडे ४५ कोटी रुपयांचा निधी पडून असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे.  विकास कामांच्या नियोजनावर एकमत होत नसल्याने या निधीची मागणीच झाली नसल्याचे सांगण्यात आले असुन उद्या १ डिसेंबर रोजी जळगाव दौर्‍यावर येणारे पालकमंत्री व भाजपाचे हेविवेट नेते चंद्रकांत पाटील याप्रश्नी काय तोडगा काढतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील ६७ पैकी ३३ गटांमध्ये विजयी करुन ग्रामीण भागातील नागरिकांनी मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेची सुत्रे भाजपाकडे सोपविली आहेत. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या मर्जीनुसार पदाधिकार्‍यांच्या निवडी झाल्या. मात्र भाजपातील आपसी गटबाजीचा फटका ग्रामीण भागाच्या विकास कामांना बसत आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे जळगावचे पालकमंत्री असून डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष आहेत. डीपीडीसीच्या सर्व साधारण योजनेतून वेगवेगळ्या विकास कामांसाठी जिल्हा परिषदेला निधी देण्यात येतो. मात्र नियोजनाचा बोजवारा उडाल्याने जिल्हा परिषदेने डिपीडीसीकडे निधीची मागणीच केली नसल्याची माहिती समोर आली असुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी यामाहितीला दुजोरा दिला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील जि.प.ला निधी वितरित करण्याची तसदी घेतली नाही.

डिपीडीसीच्या माध्यमातून प्राथमिक शाळा दुरुस्ती, दुर्बल घटकातील मुलींना भत्ता देण्यासाठी तरतूद केलेल्या ३ कोटी ३० लाख रुपयांपैकी फक्त ८५ लाख रुपये जि.प.ला प्राप्त झाले आहेत. यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र, बांधकाम विस्तारीकरण, बळकटीकरणासाठी ९ कोटी ७० लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरणासाठी डिपीडीसीतून तरतूद झालेल्या १० कोटी रुपयांपैकी एक रुपयाही जि.प.ला अद्याप प्राप्त झालेला नाही. यासोबतच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत करावयाच्या वेगवेगळ्या विकास कामांसाठी असलेला २२ कोटी रुपयांचा निधी देखील अखर्चीत आहे.

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्यासाठी ४ महिन्याचा अवधी उरलेला असतांना भाजपची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेचे नियोजनच झाले नसल्याने विकास कामांकडे भाजपाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.