
काशिमीरा परिसरातील महाजनवाडीत भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आज एकमेकांना जोरदार भिडले. दोन्ही प्रचार फेरी समोरासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर घणाघाती आरोप करण्यात आले आणि त्यानंतर धक्काबुक्की सुरू झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांची एकच पळापळ उडाली. या गोंधळात भक्तांनी गैरवर्तन केल्याचा आरोप शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे.
प्रभाग क्रमांक १४ मधील आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिंदे गटाचे अजय साळवे आणि भाजपचे अनिल ताटे यांनी प्रचार फेरी काढल्या होत्या. या दोन्ही प्रचार फेरी मीरा गावठाणमधील महाजनवाडीमध्ये आमनेसामने आल्या. त्यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप केले आणि वादाचा भडका उडाला. ताटे आणि साळवे यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी सुरू झाली. त्यामुळे साळवे यांनी भाजपची प्रचार फेरी थांबवण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी साळवे यांना कडाडून विरोध केल्यामुळे वाद आणखी भडकला. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना जोरदार भिडले. अचानक राडा सुरू झाल्यामुळे या भागातील नागरिकांची एकच पळापळ उडाली आणि या भागात तणाव निर्माण झाला.
भाजपकडून आचारसंहितेचा भंग
मीरा-भाईंदरमध्ये भाजपकडून सर्रासपणे आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकार सुरू आहेत. त्यांच्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कारवाई होणे आवश्यक असले तरी दुर्दैवाने तसे होत नाही. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा वाद सुरू झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महिलांशी गैरवर्तन केले, असा आरोप शिंदे गटाच्या विद्या साळवी आणि अलका साळवी यांनी केला आहे. या आरोपामुळे मीरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राज्याच्या सत्तेत हे दोन्ही पक्ष सहभागी असतानाही या ठिकाणी त्यांनी रस्त्यावर एकमेकांना धक्काबुक्की केल्याने भक्त आणि शिंदे गट यांची प्रतिमा मलीन झाली आहे. त्याचा जोरदार फटका दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना बसणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.





























































