
भाजपने या वर्षीच्या सुरुवातीला पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 340 कोटी रुपये तर काँग्रेसने या राज्यांमध्ये प्रचारासाठी 194 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत. दोन्ही पक्षांच्या निवडणूक खर्चाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. काँग्रेस आणि भाजप मान्यताप्राप्त पक्ष आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणाऱया पक्षांना आपल्या निवडणूक खर्चाचा अहवाल निवडणूक आयोगासमोर दाखल करणे बंधनकारक असते. भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 340 कोटी रुपयांचा खर्च प्रचारासाठी केला होता. अहवालानुसार भाजपने सर्वाधिक म्हणजे 221 कोटी रुपये खर्च उत्तर प्रदेशात केला आहे. तसेच मणिपूरमध्ये 23 कोटी, उत्तराखंड 43.67 कोटी, पंजाबमध्ये 36 कोटींहून अधिक आणि गोव्यात 19 कोटी रुपये खर्च केले आहेत.
























































