भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंची जीभ पुन्हा घसरली, पत्रकारांना म्हणाले आमचा पक्ष आम्हाला चालवू द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
raosaheb-danve

सामना प्रतिनिधी । जळगाव 

भारतीय जनता पक्षाचे मंत्री असो की प्रदेशाध्यक्ष सध्या आपला राग माध्यमांवर काढत आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज जळगावमध्ये आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेला प्रश्न जिव्हारी लागल्याने दानवे म्हणाले, आमची पार्टी आहे आम्हाला चालवू द्या ना. तुम्ही का सांगताय असे म्हणत ‘पार्टी विथ डिफरन्स’ची पुन्हा प्रचिती दिली आहे.

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे संपूर्ण ४८ लोकसभा मतदार संघात बुथ प्रमुखांचे मेळावे घेत आहेत. शनिवारी सकाळी रावेर लोकसभा मतदार संघातील बुथ प्रमुखांचा मेळावा घेतल्यानंतर दानवे जळगाव येथे आले. येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा नाराज नेते एकनाथ खडसे, खासदार ए.टी.पाटील, आमदार राजू भोळे, स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी मंत्री एम.के.पाटील, जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील उपस्थित होते. यावेळी विविध लोकसभा मतदार संघात पक्ष संघटनेचे काम कसे सुरु आहे याबद्दल रावसाहेब दानवे यांनी माहिती दिली.

खडसेंबद्दल विचारल्यावर घसरले दानवे

भाजपातील नाराज नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल भुसावळ येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांनी काही विचारले का असा प्रश्न विचारल्यावर काहीच विचारले नाही, आमचा मेळावा व्यवस्थित झाला. तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही सांगा असे दानवे म्हणाले. पत्रकारांनी पुन्हा प्रश्न केला तर खडसे यांच्यावरील आरोप सिध्द झालेले नाहीत तर त्यांच्यावर पक्ष अन्याय करत आहे का यावर दानवे म्हणाले की, आमचा पक्श खडसेंवर अन्याय करत नाही. पण आमचा पक्ष आम्हाला चालवू द्या ना, तुम्ही कशाला चालवताय असे भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले. शेवटी खडसेंबाबत थातुरमातूर उत्तरे देऊन त्यांनी पुढील प्रश्नांना उत्तरे दिली.

मागच्या आठवड्यात घरसले होते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मागील आठवड्यात दुष्काळी पाहणी करायला आलेले महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ‘पत्रकारांपेक्षा विरोधक बरे’ असे ते म्हणाले होते. आज दानवेंनी पुन्हा पत्रकारांनाच उलट उत्तरे दिली. यामुळे भाजपच्या नेत्यांना हल्ली पत्रकारांशी कसे बोलावे हे देखील कळत नसल्याची चर्चा यावेळी सुरु होती.