भाईंदरमध्ये भाजप उघडणार कत्तलखाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भाईंदर

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत मच्छी, मटणाविरोधात जैन समाजाला चिथावणी देत धार्मिक राजकारण करणाऱ्या आणि मनी व मुनीचा वापर करत सत्तेत आलेल्या भाजपने जैन समाजाचा सपशेल विश्वासघात केला आहे. सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या माध्यमातून आता मीरा-भाईंदर शहरात पश्चिमेला एक भलामोठा कत्तलखानाच उघडण्याचा घाट घातला आहे. महापौर डिंपल मेहता यांनीच याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात भाजपने केवळ जैन समाजाची मते ढापण्यासाठीच मांसाहाराचा मुद्दा उगाळल्याचे उघडकीस आले आहे.

सत्ता आल्यानंतर भाजपने मच्छी, मटण कत्तलीचा मुद्दा खुंटीला टांगून ठेवला आहे.भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी आज खास पत्रकार परिषद घेऊन भाईंदरमध्ये मोठा कत्तलखाना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा करीत मुस्लिम समाजाला खूश करून टाकले. भाईंदर पश्चिम येथील निसर्गरम्य उत्तन परिसरात सर्व्हे क्रमांक २८२ या हरितपट्टय़ात पाच एकरच्या भूखंडावर हा कत्तलखाना सुरू होणार आहे.

आता मुस्लिम समाजाचे लांगूलचालन
निवडणुकीच्या काळात जैन, गुजराती समाजाचा वापर करून घेणाऱया भाजपने सत्ता मिळाल्यानंतर आता मुस्लिम समाजाचे लांगूलचालन सुरू केले आहे. उत्तन येथे कत्तलखाना सुरू करण्याच्या घोषणेबरोबरच स्थानिकांचा प्रचंड विरोध असतानाही भाईंदर पूर्व नवघर येथे भर हिंदू वस्तीत दफनभूमी बांधण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच मीरा रोड येथे उर्दू शाळा बांधण्यात येईल, असेही महापौर डिंपल मेहता यांनी सांगितले. पालिकेचे हे धोरण दुतोंडी आहे, लांगूलचालन करणारे आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी दिली.

प्रस्ताव जिवंत केला
उत्तन येथे पाच एकरात कत्तलखाना उभारण्यासाठी भाईंदर पालिकेने काही वर्षांपूर्वी कन्सल्टंट नेमला होता. तसेच बजेटमध्ये आर्थिक तरतूदही केली होती. परंतु त्याला प्रचंड विरोध झाल्यामुळे हा कन्सल्टंटचा अहवाल केराच्या टोपलीत गेला आणि पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव बासनात गुंडाळला. मात्र भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांनी आजच्या पत्रकार परिषदेत हा कत्तलखाना सुरू करण्यात येईल, असे जाहीर करून टाकले आहे.