
मुंबईत एका भाजपच्या महिला कार्यकर्त्याला खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सदर महिला ही माजी पोलीस अधिकार्याची पत्नी आहे. भारती चौधरी असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार विक्रोळीत गोद्रेज कंपनीजवळ एक गुटखा असलेला टेम्पो भारती चौधरी यांनी अडवला. आपण पोलीस असल्याचे तिने ड्रायव्हर दीपक गुप्ताला सांगितले. चौधरी यांच्यासोबत चंदन यादव हा व्यक्तीही होता. दोघांनी ड्रायव्हर गुप्ताला धमकी दिली. तसेच ट्रक सोडवण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपये मागितले. नंतर दीपक गुप्ताने पोलिसांना फोन केला. तेव्हा विक्रोळी पोलीस स्थानकातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी भारती चौधरी आणि साथीदार चंदन यादव याची चौकशी केली. तेव्हा ते दोघे पोलीस नसल्याचे निष्पण्ण झाले. तसेच भारती चौधरी या भाजपच्या कार्यकर्त्या असून त्यांचे पती हे माजी पोलीस अधिकारी आहेत. भारती चौधरी या मुलुंडच्या पोलीस निवासस्थानात राहतात. पती निवृत्त झाले तरी त्यांनी घर रिकामे केले नसल्याचे तपासात कळाले. तसेच चौधरी यांचे पती दामोदर चौधरी यांच्यावर 2017 साली आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. भारती चौधरी आणि चंदन यादव यांची पोलीस कोठडीत रवानगी केली असून पुढील तपास सुरू आहे.



























































