
उत्तर प्रदेशमध्ये भाजप आमदाराने तिरंगा यात्रेसाठी गर्दी जमावी म्हणून कार्यकर्त्यांना मोफत पेट्रोलचे आमिष दाखवले होते. परंतु यात्रेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी फुकटच्या पेट्रोलवर अक्षरशः उड्या मारल्या. फुकटच्या पेट्रोलसाठी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली होती.
उत्तर प्रदेशमध्ये कौशंबी विधानसभा मतदरासंघात भाजप आमदार संजय कुमार यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेला गर्दी जमवण्यासाठी आमदार कुमार यांनी कार्यकर्त्यांना मोफत पेट्रोलचे आमिष दाखले. यात्रा झाल्यानंतर एका शाळेच्या आवारात कार्यकर्त्यांसाठी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल ठेवले होते. परंतु कार्यकर्ते जेव्हा पेट्रोल घेण्यासाठी आले तेव्हा कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली. कार्यकर्ते हमरीतुमरीवर आले आणि त्यांनी हाणामारी सुरू केली.
परिस्थिती इतकी चिघळली होती की आगीची एक ठिणगी जरी पडली असती तर मोठा अपघात झाला असता. परंतु कार्यकर्त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता फुकटाच्या पेट्रोलवर उड्या मारल्या. एवढ्या गदारोळानंतरही आमदार संजय कुमार यांनी चूक कबुल केली नाही. उलट विरोधी पक्षांवर या घटनेचे खापर फोडले आणि यावर कारवाई होईल असे आश्वासन दिले.


























































