
स्वतःला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाया भारतीय जनता पक्षाने नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत ‘डिफरंट’ धोरण राबविले आहे. मात्र, पक्षाने यासंदर्भात वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळा न्याय दिल्याचे दिसत आहे. नाशिक आणि पुण्यात आमदार आणि पेंद्रीय मंत्र्यांच्या नातेवाईकांना तिकीट नाकारताना मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर मात्र मेहेरबानी केली आहे. नार्वेकर यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन भाजपमध्येच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपने नगरपालिका निवडणुकीत नेते, मंत्र्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली. एकाच कुटुंबातील सहा जणांना तिकीट दिले. मात्र, महानगरपालिका निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून आमदार, खासदार तसेच मंत्र्यांच्या पत्नी किंवा मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यानुसार आधीच उमेदवारी अर्ज भरलेल्या आमदार खासदारांच्या मुलांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, मुंबईत वेगळे चित्र आहे. एकाच कुटुंबातील तिघांना उमेदवारी देत भाजपने घराणेशाही जपली आहे.
काहींना उमेदवारी दिली तर काहींना नाकारली
नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर, सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरे बेंडाळे यांनाही नाशिकमधून दावा मागे घेतला. याशिवाय कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. पुण्यात पेंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ श्रीधर, खासदार मेधा कुळकर्णी यांची मुलगी कल्याणी कुळकर्णी सरदेसाई, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा मुलगा करण आणि आमदार सुनील कांबळे यांची मुलगी सुप्रिया यांनाही उमेदवारी नाकारली आहे. मात्र, मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहिण डॉ. गौरवी शिवलकर नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. माजी खासदार किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या आणि राज के. पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित यांना तिकीट देण्यात आले आहे.
जळगावमध्ये कोल्हे कुटुंबातील तिघे रिंगणात
शिंदे गटाने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देताना मोठया प्रमाणात घराणेशाहीचा कित्ता गिरवला आहे. जळगावमध्ये बोगस कॉल सेंटर प्रकरणी तुरुंगात असलेले शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह त्यांची आई आणि मुलालाही उमेदवारी दिली आहे. त्यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. बोगस कॉल सेंटर प्रकरणी ललित कोल्हे हे तीन महिन्यांपासून कारागृहात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना धुळे येथुन जळगाव कारागृहात हलविण्यात आले होते. तेथूनच त्यांनी उमेदवारी अर्जासंदर्भातील औपचारिकता पूर्ण केली. तुरुंगात असल्यामुळे कोल्हे अर्ज दाखल करणार की नाही, अशी शहरात चर्चा होती. शिंदे गटाने ललित कोल्हे यांचा मुलगा पियुष आणि आई सिंधु कोल्हे यांनाही उमेदवारी दिली. कोल्हे कुटुंबातील तीन सदस्य जळगाव महापालिकेच्या रिंगणात उतरले आहेत.




























































