
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठय़ा उत्साहात प्रचाराला सुरुवात केली. पण अंतर्गत सर्व्हे राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आल्यामुळे भाजपने नार्वेकर यांना निवडणूक प्रचाराचा वेग थोडा कमी करण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे नार्वेकर यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे..
दक्षिण मुंबईतून महायुतीचा उमेदवार अधिकृतपणे अद्याप जाहीर झालेला नाही. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुरुवातीला प्रचार सुरू करण्यास सांगितले होते. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी प्रचार सुरू केला. मध्यंतरीच्या काळात त्यांनी नवी दिल्लीत जाऊन भाजपच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीनंतर त्यांना निवडणूक प्रचाराचा वेग जरा कमी करण्याचे आदेश भाजप पक्षश्रेष्ठाRनी दिल्याचे वृत्त आहे.
मतदारांमध्ये नाराजी
लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर माध्यमातून अंतर्गत सर्व्हे केले. हे सर्व्हे अनेक विद्यमान खासदारांच्या विरोधात केले. खासकरून शिंदे गटाच्या खासदारांच्या विरोधात गेल्याने शिंदे गटाच्या तीन विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले. त्याच धर्तीवर राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अंतर्गत सर्व्हे आला. विधानसभेतील आमदार अपात्रतेचा निकालाच्या मुद्दय़ावरून राहुल नार्वेकर यांच्या विरोधात खासकरून मराठी मतदारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे सर्व्हेमध्ये आढळून आले आहे.


























































