प्रदूषणकारी प्रकल्पांना एसआरएचा दणका; मुंबईतील 116 गृहप्रकल्पांचे काम बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एसआरए ऍक्शन मोडवर आले आहे. बांधकामाच्या ठिकाणी वायू प्रदूषणाच्या नियमावलीचे उल्लंघन करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱया मुंबई शहर आणि उपनगरातील तब्बल 116 गृहप्रकल्पांना एसआरएने काम बंद नोटीस बजावली आहे. विकासकाकडून प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत ही बंदी लागू असणार आहे.

मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि हवेची खालावलेली गुणवत्ता चिंतेचा विषय ठरली आहे. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली विकासकामे तसेच विविध गृहनिर्माण प्रकल्पांतून उडणारी धूळ आणि राडारोडा याचे मुख्य कारण आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सध्या आठशेहून अधिक एसआरए प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यापैकी नियमांचे उल्लंघन करणाऱया 116 गृहप्रकल्पांना एसआरएने काम बंद करण्याचे आदेश दिले आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पालिकेने बांधकामाच्या ठिकाणी लागू करण्यासाठी 28 कलमी नियमावली जारी केली आहे. त्याच धर्तीवर एसआरएने नियमावली तयार केली असून त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

वायू प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी चहुबाजूंनी हिरवे पडदे लावणे किंवा धूळ थोपवण्यासाठी स्प्रिंकलर लावणे अशा विविध उपाययोजना करणे बंधनकारक आहे, मात्र काही बांधकाम व्यावसायिकांनी या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे पाहणीत आढळले आहे. त्यामुळे या प्रकल्पांना काम बंदची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती एसआरएच्या एका अधिकाऱयाने दिली.

तक्रारींसाठी तयार केले खास ऍप

प्रदूषणकारी प्रकल्पांवर वॉच ठेवण्यासाठी एसआरएने ‘श्वास’ नावाचे ऍप तयार केले आहे. या ऍपमुळे एखाद्या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी प्रदूषण होत असल्यास नागरिकांना त्याबाबतची तक्रार थेट एसआरएकडे करता येणार आहे. प्रत्येक बांधकामाच्या साईटवर असलेले क्यूआर कोड स्कॅन करूनदेखील नागरिक तक्रार करू शकतात. तक्रारीसोबत फोटो अपलोड करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.