
मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी असणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची तर शिक्षण समिती अध्यक्षपदी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांची निवड झाली. या दोन्ही अध्यक्षपदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही वैधानिक समित्यांची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी आज पालिका सभागृहात केली.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे हे स्थायी समितीवर 81 वे अध्यक्ष ठरले. त्यांनी 13 वर्षे स्थायी समितीवर काम केले आहे. तसेच, त्यांनी शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्ता कालावधीत काही वर्षे सभागृह नेते म्हणून देखील काम केले होते. 2017 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करून मुलुंड येथील मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यावेळी त्यांनी भाजपचे गटनेते पदावर काम केले आहे. शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध विजयी झालेल्या राजेश्री शिरवडकर चार वेळा नगरसेविका पदावर निवडून आल्या असून त्यांनी स्थायी समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. दोन्ही समित्यांच्या नवनियुक्त अध्यक्षांचे महापौर रितू तावडे, भाजपचे गटनेते आणि सभागृहनेते गणेश खणकर, शिंदे गटाचे गटनेते अमेय घोले आदींनी अभिनंदन केले.
विरोधी पक्षांकडून अभिनंदन
स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षांचे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार, अजित पवार गटाच्या गटनेत्या डॉ. सईदा खान, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशोधर फणसे, माजी महापौर श्रद्धा जाधव आदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.






























































