
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी ) येथील भुयारी टर्मिनस उभारणीच्या कामासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने टेंडर काढले असून येत्या सहा महिन्यांत सर्व टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या टर्मिनससाठी 1800 कोटी रुपये खर्च येणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील 4.9 हेक्टर जागेवर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुयारी टर्मिनस बांधण्यात येणार आहे.
या स्थानकात जमिनीखाली तीन मजले बांधले जाणार असून वरती एमएमआरडीएच्या आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्राच्या इमारतीचा टॉवर बांधण्यात येणार आहे. त्याची उंची 96 मीटर असणार आहे. याआधी या इमारतीची उंची 61 मीटर ठेवण्यात येणार होती. त्यास एमएमआरडीएला विरोध केला होता. त्यामुळे टर्मिनसच्या कामाला उशीर झाला होता. आता 96 मीटर उंचीला केंद्राने परवानगी दिल्याने अधिक मजल्याची इमारत बांधून मोक्याची जागा देण्यातून होणारे नुकसान आता काही प्रमाणात कमी करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
बीकेसीच्या भुयारी टर्मिनसच्या पहिल्या आणि दुसऱया मजल्यावर वाहन पार्किंग तर तिसऱया मजल्यावर सर्वात खाली तळाला बुलेट ट्रेनचे टर्मिनस असणार आहे. येथे बुलेट ट्रेनसाठी एकूण 16 डब्यांच्या लांबीचे सहा प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहेत. त्यातील प्रत्यक्षात चार प्लॅटफॉर्मच बुलेट ट्रेनसाठी वापरले जाणार असून दोन प्लॅटफॉर्म अतिरिक्त भविष्यकालीन नव्या मार्गांसाठी आताच राखीव ठेवण्यात येणार आहेत.
‘कट ऍण्ड कव्हर’ तंत्रज्ञान वापरणार
मुंबई ते अहमदाबाद हे 508 किलोमीटर आणि आठ तासांचे अंतर अवघ्या तीन तासांत कापणाऱया बुलेट ट्रेनला सध्या 10 डबे असणार असून पुढील भविष्यातील प्रवासी वाढ गृहीत धरून काही सहा प्लॅटफॉर्मची लांबी 480मीटर इतकी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे 16 डब्यांची बुलेट ट्रेन या प्लॅटफॉर्मवर उभी करणे भविष्यात शक्य व्हावे यासाठी ही जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या सूत्रांनी दिली आहे. बीकेसी टर्मिनसच्या बांधकामाचा कंत्राटदार मे 2020पर्यंत निश्चित होऊन ‘कट ऍण्ड कव्हर’ तंत्राने या स्थानकाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी साधारण दोन वर्षे लागणार आहेत.






















































