बीकेसी जम्बो कोविड सेंटरमधून 9 हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेने वांद्रे कुर्ला सेंटरमध्ये सुरू केलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये केलेल्या अद्ययावत आणि दर्जेदार आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत या ठिकाणाहून तब्बल 9 हजार 145 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे. यामध्ये अनेक नव्वदीच्या ज्येष्ठांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या कोविड सेंटरमध्ये कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. बीकेसी कोविड सेंटरला आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट देऊन डॉक्सर्स, नर्स, आरोग्य कर्मचार्‍यांचे कौतुक केले.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिकेने जम्बो कोविड सेंटर ही संकल्पना राबवून रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. ‘एमएमआरडीए’च्या सहकार्याने बीकेसी येथे उभारण्यात आलेले जम्बो कोविड सेंटर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पालिकेकडे सुपूर्द करण्यात आले. या कोविड सेंटरमध्ये दोन हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी आतापर्यंत दहा हजार 17 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून 9145 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. डेरे यांच्या टीमचे काम कौतुकास्पद असल्याचेही गौरवोद्गारही महापौरांनी यावेळी काढले. या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेमुळे कोरोनाबाबतच्या सर्व प्रकारच्या चाचण्या करता येत आहेत. अतिजोखमीच्या कोरोना रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन देण्यापूर्वी करण्यात येणारी ‘आयएएल सिक्स’ ही तपासणीदेखील या ठिकाणी करण्यात येत आहे. ज्यामध्ये 15 मिनिटांत रुग्णाच्या चाचणीचा अहवाल मिळत असल्याने रुग्णाला इंजेक्शन द्यायचे की नाही याचा निर्णय तातडीने घेणे या ठिकाणच्या डॉक्टरांना शक्य होत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या. याशिवाय कोरोना रुग्णांसाठी करण्यात येणारी ‘डायमर’ ही तपासणीसुद्धा या प्रयोगशाळेत होणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. या प्रयोगशाळेतून दिवसभरात चार हजार चाचण्यांचा अहवाल आपल्याला कळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘सीएसआर’ फंडातून ही कंटेनरमधील प्रयोगशाळा पालिकेला प्राप्त झाल्याची माहितीही यावेळी महापौरांनी दिली.

अशा आहेत सुविधा
– बीकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये असलेल्या दोन हजार 26 खाटांमध्ये 108 बेड आयसीयू, 12 बेड डायलिसिसचे आहेत. रुग्णांच्या सुविधेसाठी या ठिकाणी 213 डॉक्टर्स कार्यरत असून 208 परिचारिका व 232 वॉर्डबॉय अहोरात्र काम करीत आहेत. या शिवाय बायोसेफ्टी 3 श्रेणीतील ‘व्हायरस चाचणी अद्ययावत प्रयोगशाळा’ही (व्हायरस इम्युनोलॉजी लॅब) कंटेनरमध्ये सुरू करण्यात आली आहे. याआधी या ठिकाणच्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी बाहेर न्यावे लागत होते. मात्र आता याच ठिकाणी नमुन्यांची चाचणी होऊन अहवाल मिळत आहेत. कोरोनाबाबत सर्व प्रकारच्या चाचण्या या ठिकाणी होणार आहेत.