
बहुप्रतीक्षित बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौक या भूमिगत मेट्रो-3 मार्गाचा दुसरा टप्पा सुरू होणार असून मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. उद्या, शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते श्री सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील. शनिवारपासून सर्वसामान्य जनतेला या मार्गावर मेट्रोने प्रवास करता येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून 33.5 किमीच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मेट्रो-3 मार्गिकेचे काम सुरू आहे. यातील 12.69 किमी लांबीचा आरे ते बीकेसी हा टप्पा 7 ऑक्टोबर 2024 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. त्यानंतर आता उद्या बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौक या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. सीएमआरएस पथकाने तीन ते चार दिवस या मार्गाची तपासणी केली होती. आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळताच ही मेट्रो मार्ग सुरू होणार आहे.
सहा स्थानकांचा समावेश
बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौक हा 9.77 किमी लांबीचा मेट्रो मार्ग आहे. यात बीकेसी, धारावी, शीतलादेवी, दादर, श्री सिद्धिविनायक मंदिर, आचार्य अत्रे चौक या सहा स्थानकांचा समावेश आहे.