डॉ. कुकडे यांना पद्मभूषण हा सेवाव्रतीचा सन्मान!

dr-ashok-kukade

onkar-danke>> ओंकार डंके (ब्लॉगर)

25 जानेवारी 2019 रोजी हिंदुस्थानच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील लातूरमध्ये सेवाव्रत घेऊन कार्य करणाऱ्या डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि लातूरमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्राला डॉ. कुकडे यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देणारा ओंकार डंके यांचा विशेष ब्लॉग.

काही दिवस हे अत्यंत आनंदाचे दिवस म्हणून माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील. 2 एप्रिल 2011 आणि 16 मे 2014 हे दिवस असेच आनंदाचे दिवस होते. आता या यादीत 25 जानेवारी 2019 या दिवसाची भर पडली आहे.

मी माझी भावंड ज्या हॉस्पिटलमध्ये जन्मली, अशा लातूरच्या विवेकानंद हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राच्या उभारणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या डॉ. अशोक कुकडे ( काका) यांना 25 जानेवारी 2019 या दिवशी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला.

पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजातून एम. एस. पूर्ण केल्यानंतर डॉ. कुकडे यांनी 1966 साली लातूर या त्या काळातील सर्वात मागास समजल्या जाणा-या गावात डॉ. अलुरकर आणि डॉ. सौ. कुकडे काकू यांच्या सोबतीने विवेकानंद हॉस्पिटल सुरू केले. सुरुवातीच्या काळात सौ. अलुरकर वहिनी घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आणि आम्ही तिघे दिवस-रात्र हॉस्पिटलचे काम करत असू असा उल्लेख ‘कथा एका ध्येयसाधनेची’ या काकांच्या आत्मचरित्रात आहे. काही वर्षातच या तिघांच्या टीममध्ये डॉ. भराडिया दाखल झाले. या चौघांनीही विवेकानंद हॉस्पिटलच्या उभारणीत मोठे कष्ट घेतले आहेत.

डॉ. कुकडे यांच्या भाषेत सांगायचे तर विवेकानंद हॉस्पिटल ‘हा प्रकल्प म्हणजे प्रयोग आहे.’ आरोग्याच्या प्राथमिक सुविधाही ज्या भागात पोहचल्या नव्हत्या अशा भागातील रूग्णांना कमीत कमी दरात सर्वात चांगले उपचार उपलब्ध करून देण्याच्या प्रयोगातून हा प्रकल्प उभार राहिला. या प्रकल्पाचे अनेक लाभार्थी संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात आहेत. फार लांब कशाला जाऊ? मी आणि माझ्या घरातल्या मंडळींना आजारी पडल्यावर सर्वात प्रथम विवेकानंद हॉस्पिटलचीच आठवण होते. या हॉस्पिटलमध्ये मिळालेल्या उपचारामुळे आम्ही सारे वेळोवेळी बरी झालो आहोत.

लातूर आणि मराठवाड्यातील कॅन्सरनं रूग्णांना उपचारासाठी पुणे- मुंबईत जावे लागते. त्यांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी विवेकानंद हॉस्पिटलने काही वर्षांपूर्वी कॅन्सरचं हॉस्पिटल सुरू केले आहे. कॅन्सरचे उपचार दीर्घकाळ चालतात. त्या काळात रूग्णांच्या नातेवाईकांना शहरामध्ये राहण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. कॅन्सरचे रूग्णांच्या नातेवाईकांसाठी मुंबईतील ‘नाना पालकर स्मृती समिती’ सारखा कायमस्वरूपी निवासी प्रकल्प उभारणीचे काम सध्या लातूरमध्ये सुरू आहे.

डॉ. कुकडे यांनी आयुष्यभर फक्त विवेकानंद हॉस्पिटलच्या प्रकल्पाचेच काम केले असते तरी ते आदरणीय ठरले असते. पण ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांच्यावर असलेल्या संघ संस्कारामुळे ते तेवढ्यावरच थांबू शकत नव्हते.

काकांनी लातूर शहर ते अखिल भारतीय पातळीपर्यंत संघ कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. अनेक संघ कार्यकर्त्यांचे ते पालक आहेत. डॉ. कुकडे यांनी त्यांना शब्दश: घडवलं. कामावरची निष्ठा, ते पूर्ण करण्यासाठी करावं लागणारं अगदी बारीक नियोजन, संपूर्ण अभ्यास, झपाटलेपण, वेळेचे नियोजन या गोष्टी माझ्यासारखे अनेकजण आजही त्यांच्याकडे पाहून शिकत आहेत.

1970 च्या दुष्काळानंतर महाराष्ट्रात आपत्ती विमोचनासाठी सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे काका महाराष्ट्र अध्यक्ष होते. 1993 साली लातूर आणि धाराशीव जिल्ह्यात मोठा भूकंप झाला. त्यावेळी भूकंपग्रस्त भागात सर्वात पहिली पोहोचलेली रूग्णवाहिका ही विवेकानंद हॉस्पिटलची होती. भूकंपग्रस्त भागात जनकल्याण समितीने केलेले काम आजही सर्वांच्या लक्षात आहे.

भूकंपग्रस्तांची पहिली गरज ही वैद्यकीय उपचार ही होती ती विवेकानंद हॉस्पिटलने पूर्ण केली. त्यांनंतर भूकंपग्रस्तांना निवारा हवा होता. भूकंपात संपूर्ण गाडले गेलेले रेबेचिंचोली या गावाचे पुनर्वसन जनकल्याण समितीने केले. गावाचे पुनर्वसन करून जनकल्याण समिती थांबली नाही. या भागतल्या विद्यार्थ्यांसाठी जनकल्याण निवासी विद्यालयाचा प्रकल्प सुरू केला. आज लातूरजवळच्या हरंगूळमध्ये जनकल्याण निवासी विद्यालयाचा प्रकल्प सुरू आहे. लातूर आणि धाराशीव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुले या विद्यालयात शिकतात. लातूर – धाराशीव जिल्ह्यातील ज्या गावात शिक्षणाची सोय नाही, घरी बेताची आर्थिक परिस्थिती आहे अशा अनेक मुलांना या विद्यालयाने अगदी नाममात्र दरात शिक्षण दिले आहे. या प्रकल्पाचे पालक म्हणून डॉ. कुकडे काकांचे योगदान मोठे आहे.

जनकल्याण विद्यालय हा भूकंपग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेला प्रकल्प. तर मराठवाड्यातील अन्य विद्यार्थ्यांसाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्थापनेत आणि पुढील वाटचलीत काकांचा सहभाग राहिलेला आहे.

लातूरमधील दुष्काळाच्या निवारणासाठी उभ्या राहिलेल्या जलयुक्त लातूर या चळवळीत वयाच्या सत्तरीतही त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते.

कोणते पद, मान-सम्मान, पुरस्कार मिळावे म्हणून डॉ. कुकडे काकांनी काम केले नाही. त्यांच्यातील संघ संस्कारातून हे सर्व घडले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन काकांचा सम्मान केला आहे.

आपल्या कार्यावर, ध्येयावर निष्ठा ठेवून काम करणा-या देशभरातल्या हजारो कार्यकर्त्यांना हा पुरस्कार खूप मोठी ऊर्जा देणारा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या