‘टराटरा आणि फराफरा’ करता करता माणूस मेला

65 वर्षांच्या एका निवृत्त माणसाला बद्धकोष्ठाचा त्रास होता. या त्रासामुळे तो हैराण झाला होता. यावर अनेक उपाय करून पाहिले मात्र पीटरला(बदललेले नाव) आराम पडत नव्हता. अखेर पीटरने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. कोलंबियातील एका रुग्णालयात पीटर गेला असता त्याची डॉ.रावडी रोईस यांच्याशी भेट झाली होती. रावडी यांनी पीटरची प्रकृती तपासली आणि त्याचा इलेक्ट्रोकार्डियोग्राम काढण्यास सांगितलं होतं. पीटरला नीट तपासलं असता डॉक्टरांना दिसून आलं की पीटरच्या हृदयाची धडधड वाढली आहे आणि त्याला घामही येत आहे.

पीटरचा वैद्यकीय इतिहास तपासला असता त्याला दृदयविकार असल्याचं दिसून आलं होतं. हे पाहिल्यानंतर पीटरला एनिमा देऊ नये असं सांगण्यात आलं होतं. जवळपास 7-10 दिवस संडासला न झाल्याने पीटर अस्वस्थ होता. त्याने एनिमा देण्याने डॉक्टरांना अनेकदा विनंती केली मात्र डॉक्टर रॉईस यांनी असं करणं जोखमीचं ठरेल असं सांगत त्याला एनिमा दिला नाही. डॉक्टरांनी त्याला खोलीमध्ये शक्य होईल तितक्या फेऱ्या मार असा सल्ला दिला होता. हा सल्ला देऊन डॉ.रावडी निघून गेले होते. पीटरने ही संधी साधून अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एनिमा देण्याची विनंती केली. त्याच्या विनवण्या ऐकून त्याला एनिमा देण्यात आला.

काहीवेळानंतर डॉ.रावडी यांच्याकडे एक कर्मचाऱी धावत आला आणि त्याने सांगितलं की पीटरची प्रकृती खालावली आहे. डॉ.रावडी जेव्हा पीटरला पाहायला पोहोचले तेव्हा तो टॉयलेट सीटवर बसलेला असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी विचारणा केली असता पीटरला एनिमा दिल्याचे सांगण्यात आले. एनिमा दिल्याने पीटरला जोरात कळ आली आणि तो धावत संडासात गेला. पीटर कमोडवर बसताच त्याचे पोट वेगाने रिकामे झाले. मात्र पोट रिकामे होत असताना त्याच्या हृदयावर ताण आला होता. पीटरला संडास करतानाच हृदयविकाराचा झटका आला होता. अशाच पद्धतीने प्रख्यात गायक एल्विस प्रेसली याचाही मृत्यू झाला होता.