आरोग्य -रक्तवाहिन्या आणि त्यांचे व्यवस्थापन

हृदय तसेच रक्तवाहिन्या ही आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाची प्रणाली आहे, जी आपल्या अवयवांमध्ये पोषक घटक आणि ऑक्सिजनचा प्रसार करते तसेच अशुद्ध रक्त फुप्फुसात परत आणते. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग शरीरातील प्रत्येक अवयवावर तसेच विविध वयोगटांतील व्यक्तींमध्ये दिसून येतात.

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचे प्रकार

जन्मजात हृदयरोग : दहा हजारांपैकी 3 ते 4 नवजात बालकांवर याचा परिणाम होतो. हे दोष अनेकदा गुंतागुंतीचे ठरू शकतात. अशा वेळी जन्मल्यानंतर अवघ्या 15 दिवसांच्या आत शस्त्रािढया करावी लागते.

व्हॉल्ह्युलर हृदयरोग : रूमॅटिक हार्ट व्हॉल्ह्युलर रोग विशीत अथवा तिशीत हृदयावर परिणाम करतो, जेथे झडप उघडणे आव्हानात्मक होते. त्यामुळे दम लागतो आणि छातीत धडधड होते.

कोरोनरी धमनी रोग: हा साठीनंतरचा रोग पुरुष आणि स्त्रियांमध्ये मृत्यूचे सर्वात सामान्य कारण ठरत आहे. यामध्ये  हृदयाला रक्तपुरवठा करणारी वाहिनी अरुंद होऊन छातीत दुखणे, अॅन्जाइना किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो

महाधमनी रोग : शरीराच्या सर्व अवयवांना रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला जोडलेली एक मोठी धमनी आहे. या धमनीच्या कार्यात अडथळा येणे, विस्तार होणे हे अनेकदा जीवघेणे ठरू शकते आणि त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.

अरिथमिया : अरिथमिया हा एक हृदयासंबंधित आजार आहे. ज्यामध्ये हृदयाचा ठोका अनियमित स्वरूपाचा असतो.

परिधीय धमनी रोग: जेव्हा हृदयाच्या बाहेर रक्तवाहिन्या अरुंद होणे किंवा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो तेव्हा ही समस्या उद्भवते. त्यामुळे प्रभावित अंगांमध्ये वेदना, ा@ढम्पिंग आणि रक्ताभिसरणात अडचणी येऊ शकतात.

डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT): हा अशुद्ध रक्तवाहिन्यांचा एक विकार आहे. यात शरीरात खोलवर असलेल्या अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात, रक्तवहनास अडथळा निर्माण होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांची विविध कारणे आहेत. उच्च रक्तदाब, कालेस्टेरॉल, तंबाखूचे सेवन, टाइप 2 मधुमेह, कौटुंबिक इतिहास, शारीरिक हालचालींचा अभाव, जास्त वजन किंवा लठ्ठपणा, जास्त प्रमाणात सोडियम, साखर आणि चरबीयुक्त आहार घेणे, मद्यपान, ठरावीक औषधे, गर्भधारणेदरम्यान होणारा मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. हृदयाच्या गुंतागुंतीचे संकेत अॅन्जाइना म्हणून निदान होतात.  इतर चिन्हे म्हणजे श्वास घेण्यात अडचण येणे, चक्कर येणे. तुमच्या संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्यांमधील येणाऱया अडथळ्यांची लक्षणे म्हणजे चालताना अस्वस्थता किंवा तुमच्या पायांवर बरे न होणारे फोड, तुमच्या टाचेवर येणारा लालसरपणा, चेहरा सुन्न पडणे, पाय सुजणे आणि बोलताना अडखळणे किंवा दृष्टिदोष निर्माण होणे.

उपचार : हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगावरील उपचार पद्धती ही त्याची लक्षणे आणि विशिष्ट प्रकारानुसार भिन्न असू शकते. उपचारांमध्ये जीवनशैलीत बदल करणे, तज्ञांच्या सल्ल्याने औषधं घेणे किंवा शस्त्रािढया करणे यांचा समावेश असू शकतो.

प्रतिबंध : टाईप 2 मधुमेह, उच्च कालेस्टेराल किंवा उच्च रक्तदाबासारख्या आरोग्य समस्यांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे, वजन नियंत्रित राखणे, कमी चरबीयुक्त आहार आणि आहारातील सोडियमचे प्रमाण मर्यादित राखणे, दररोज व्यायाम करणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे हे हृदयाला निरोगी ठेवू शकते.

डॉ. बिपीनचंद्र भामरे

(लेखक मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन आहेत)