लोकलच्या दरवाजावर निळा दिवा लुकलुकणार, लोकल सुटण्याचा इशारा मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

धावत्या लोकलमधून पडून होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता लोकलच्या प्रत्येक दरवाजाच्या वरच्या भागावर एक निळ्या रंगाचा दिवा बसवण्यात येणार आहे. ट्रेन सुरू होत असताना हा दिवाही पेटेल. यामुळे आता ट्रेन सुरू होत आहे हे प्रवाशांना समजणार आहे. यामुळे अपघात टाळणे शक्य होणार आहे. प्रवाशांना धावती लोकल पकडू नका असे वारंवार उद्घोषणा करून सांगत असते. तरीही लोक जीव धोक्यात घालून धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे धावती गाडी पकडताना प्रवासी जखमी होण्याचे प्रमाण मोठे आहे.

दररोज सरासरी दहा प्रवाशांचा रेल्वे प्रवासात बळी जात असतो. गेल्याच आठवडयात विक्रोळी स्टेशन मास्तरांनी अशाच प्रकारे लोकलखाली गेलेल्या 11 वर्षांच्या मुलीला वाचवले होते. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत सोशल मीडियावर आज एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत लोकल सुरू होत असताना निळा दिवा पेटताना दिसत आहे. दिवा चालू झाल्यावर ट्रेन प्लॅटफॉर्मवरून रवाना होताना दिसत आहे. गोयल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘सेफ्टी फर्स्ट. लोकलमध्ये चढणाऱया प्रवाशांसाठी प्रत्येक डब्याच्या दरवाजाच्या वर निळया रंगाचा दिवा लावण्यात आला असून हा दिवा प्रवाशांना लोकल सुरू झाल्याचे सूचित करेल. यामुळे शेवटच्या क्षणी लोकलमध्ये चढताना होणाऱया दुर्घटना टाळता येतील.’

सध्या मुंबईमध्ये अनेकजण प्लॅटफॉर्मवरील लोकल धावत जाऊन पकडण्याचा प्रयत्न करतात. लोकल कोणत्या क्षणी सुटेल हे माहीत नसते. यामुळे अचानक प्रवासी लोकल आणि फलाटाच्या फटीत अडकून त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व किंवा प्रवाशांचा हकनाक बळीही जातो. मात्र आता या ‘निळया सुरक्षा दिव्या’मुळे लोकल सुरू होत आहे हे लोकांना कळणार आहे. एखादी लोकल सुटणार आहे हे लोकांना दूरवरून दिसणार आहे. शिवाय यामुळे लोकल पकडताना होणारे अपघात टाळणे आता शक्य होणार आहे.

गार्डकडे नियंत्रण
मेट्रो आणि एसी लोकलमध्ये दारे आपोआप बंद होत असल्याने अपघात होण्याची भीती नसते. लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा मध्य रेल्वेचा प्रयोग अयशस्वी झाला होता. त्यामुळे कुर्ला कारशेडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एका लोकलमध्ये निळा सुरक्षा संदेश देणारी यंत्रणा बसविण्यात आली असून तिचे नियंत्रण गार्डकडे राहणार आहे.