
पालिकेचे महत्त्वाचे 15 दवाखाने आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या दवाखान्यांची सध्याची सकाळी 9 ते 4 ही वेळ नोकरवर्गासाठी गैरसोयीची ठरत असल्याने संबंधित दवाखाने दुपारी 4 नंतरही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी महापौर आणि पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यामध्ये खासगी आरोग्य संस्थेच्या माध्यमातून दवाखान्यांची वेळ वाढवून सुविधा देण्यात आली तरी गोरगरीब रुग्णांना उपचार मात्र मोफतच मिळणार आहेत.
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत एकूण 186 दवाखाने कार्यरत असून या दवाखान्यांमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रुग्णांना आरोग्यसेवा दिली जाते. या सेवेचा लाभ हजारो रुग्ण घेत असले तरी याच दरम्यान बहुतांशी सर्वच शासकीय-खासगी कार्यालयांच्या कामकाजाच्या वेळा असल्याने संबंधित ठिकाणी काम करणार्या नोकरवर्गाला पालिकेच्या या आरोग्यसेवेचा लाभ घेता येत नाही. शिवाय सायंकाळी दवाखाने बंद असल्याने औषधांकरिता रुग्णांना बराच वेळ दवाखान्यात थांबावे लागते. तसेच ठरावीक वेळेत हे दवाखाने सुरू असल्यामुळे या वेळेत रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढते. परिणामी केवळ ठरावीक वेळेमुळे पालिकेच्या रुग्णसेवेचा लाभ घेऊ शकत नसणार्या गोरगरीबांना खासगी रुग्णालयांत महागडे उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे पालिकेचे दवाखाने दुपारी 4 ते रात्री 11 या वेळेत सुरू ठेवावे अशी मागणी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी तत्कालीन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या एकूण 186 पैकी सध्या 15 दवाखाने दुपारी 4 ते रात्री 11 या वेळेत खासगी आरोग्य संस्थेच्या माध्यमातून चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- नव्या वेळेत दवाखाने चालवण्यासाठी ‘मे. रुबी अलकेअर सर्व्हिसेस लि.’ कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे.
- दोन वर्षांच्या कामाकरिता वैद्यकीय अधिकार्यांना प्रतिमहा 60 हजार रुपये तर बहुउद्देशीय कामगारांना प्रतिमहा 17,500 रुपये मानधन देण्यात येणार आहे.
- उपरोक्त दवाखान्यांमध्ये दोन वर्षांसाठी 15 वैद्यकीय अधिकारी व 15 बहुउद्देशीय कामगारांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली जाणार आहे.
- दोन वर्षांचा एकूण दोन कोटी 79 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
या म्युनिसिपल दवाखान्यांची निवड
- ए विभाग – कुलाबा म्युनिसिपल दवाखाना
- बी विभाग – वालपाखाडी दवाखाना
- डी विभाग – बाने कंपाऊंड दवाखाना
- ई विभाग – साऊटर स्ट्रीट दवाखाना
- एफ/नॉर्थ – रावळी कॅम्प, वडाळा दवाखाना
- जी/साऊथ – बीडीडी चाळ दवाखाना
- एच/ईस्ट – कालिना दवाखाना
- एच/वेस्ट – ओल्ड खार दवाखाना
- के/वेस्ट – एन. जे. वाडिया दवाखाना
- पी/नॉर्थ – चोक्सी दवाखाना
- आर सेंट्रल – गोराई म्हाडा दवाखाना
- एल विभाग – चुनाभट्टी दवाखाना
- एन विभाग – रमाबाई आंबेडकर दवाखाना
- एस विभाग – कांजूर व्हिलेज दवाखाना


























































