पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी वापराल तर खबरदार

1112

पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी वापरणार्‍यांना पालिका आता चांगलाच दणका देणार आहे. यासाठी पालिका सर्व 24 वॉर्डमध्ये ‘भरारी पथके’ नेमणार असून पाण्याचा अपव्यय करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पाण्याचा गैरवापराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे भविष्यकाळासाठी पिण्याचे पाणी वाचवून ठेवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येते. तरीदेखील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा वापर बागकाम, गाडय़ा धुणे, शौचालयातील फ्लश अशा कामांसाठी सर्रासपणे केला जातो. शिवाय खासगी यानगृह, वाहन दुरुस्ती केंद्रे आणि सोसायटय़ांमधील सुरक्षा रक्षकांकडून वाहने धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो.  विशेष म्हणजे वाहने धुतलेले पाणी याच ठिकाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजारही फैलावतात. या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करणारा ठराव नगरसेविका प्रीती साटम यांनी मांडला होता. याला पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देताना लवकरात लवकर कार्यवाही सुरू करणार असल्याचा अभिप्राय दिला आहे.

अशी होणार कार्यवाही

पाण्याचा अपव्यय करणार्‍यांवर नजर ठेवणे आणि कारवाई करण्यासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार असून अधिकार्‍यांची नेमण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेच्या 24 विभाग कार्यालयातील अनिधिकृत जलजोडण्यासंबंधी व त्या संबंधातील सर्व प्रकारच्या तक्रारी सोडवण्यासाठी जल अभियंता यांच्या अखत्यारीतील उप जलअभियंता यांच्या आस्थापनेवर  10 पदे निर्माण करण्याचा निर्णय 2014 मध्येच घेण्यात आला आहे. ही पदे लवकरात लवकर भरण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. या कर्मचारी वर्गाच्या माध्यमातून अनधिकृत जलजोडण्यासंबंधिच्या तक्रारी सोडवणे, कारवाई करणे अशी कामे केली जाणार आहेत.

 

पाणीचोरांवरही कारवाई

झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा नळजोडणी घेऊन पाण्याची चोरी केली जाते. यामुळे नियमित बिल भरणार्‍या ग्राहकांना पुरेसे पाणी मिळत नाही, शिवाय बिलाचा भुर्दंड मात्र पडतो. या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी भागातील अनधिकृत जल जोडण्यांचा शोध घेऊन विशेष पथक नेमावे व दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक सदानंद परब यांनी केली होती. यावर अभिप्राय देताना पालिकेने पाण्याचा गैरवापर आणि पाणी चोरी रोखण्यासाठी

जोरदार कारवाई सुरू असून महसुलात वाढ होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या