महापालिकेच्या कोरोना नियंत्रण कामगिरीचा जगभरात डंका; मूलभूत, पायाभूत सुविधांमध्येही सरस कामगिरी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सुविधांसह रस्ते, पूल, पाणी अशा पायाभूत सुविधा देणाऱया मुंबई महापालिकेने जगाला अनोळखी असलेल्या अत्यंत भयानक अशा कोरोना महामारीला यशस्वीपणे रोखून जगासमोर मुंबई मॉडेलचे यशस्वी उदाहरण ठेवले. त्यामुळे मुंबई महापालिकेचा डंका जगभर झाला. अनेक देशांनी महापालिकेचे हे मुंबई मॉडेल त्यांच्या देशात यशस्वीपणे राबवले आणि कोरोना नियंत्रणात आणला, असे गौरोवोद्गार नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काढले.

विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात मुंबई महापालिकेच्या कारभारावर विरोधकांनी टीका केली. या टीकेला नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना मुंबई महापालिकेच्या कोरोना नियंत्रण कामगिरीचे, मुंबई मॉडेलचे कौतुक केले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची जगाने दखल घेतल्याचे त्यांनी विधान परिषदेच्या निदर्शनाला आणून दिले.

मराठी शाळांच्या पटसंख्येत वाढ

मुंबई महापालिका मराठी शाळांच्या पटसंख्येत 2021-22 मध्ये सुमारे एक हजाराने वाढ झाली आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वेगवेगळ्या सुविधा या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. गणवेश, बुट, पायमोजे, रेनकोट, छत्री, मध्यान्ह भोजन, सुसज्ज शालेय इमारतींचा यात समावेश आहे. व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरही महानगरपालिकेने सुरू केल्याचे तनपुरे म्हणाले.

मुंबई कोस्टल रोडचे काम प्रगतिपथावर

मुंबई कोस्टल रोडचे काम हे प्रगतिपथावर आहे. कोरोनाचे संकट आणि न्यायालयांच्या काही निर्णयामुळे या प्रकल्पाला काही काळ विलंब झाला. मात्र, आता हे काम वेगाने सुरू आहे, असे तनपुरे म्हणाले.

मुंबईत 25 ई–वाचनालये, सफाई कर्मचाऱयांना घरे 

मुंबई मनपा हद्दीत 2020-21 मध्ये 25 माध्यमिक शाळांमध्ये ई-वाचनालये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहेत. अद्ययावत अशा या 25 लायब्ररी आहेत तसेच आश्रय योजनेंतर्गत मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱयांना घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अत्यंत पारदर्शक पद्धतीने योग्य किमतीमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येईल, असे तनपुरे म्हणाले.

माहिती-संपर्कासाठी वॉररूम, ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण

कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेने अत्यंत चांगले काम केले. कोरोना विषाणूचे स्वरूप माहिती नसल्यामुळे सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र, महानगरपालिकेने त्यावर मात करीत सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरवल्या. प्रत्येक प्रभाग पातळीवर वॉररूम, खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड आरक्षित करून उपचारांचा वेग वाढवला. रुग्णांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळावा, यासाठी आा@क्सिजन प्लँटची निर्मिती केली. अशा प्रकारे प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण बनत लोकांचे प्राण वाचवले. या सर्वांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पारदर्शक पद्धतीने निविदा मागवून तात्काळ कामे केली, अशी माहिती तनपुरे यांनी दिली.

मिठी नदीच्या वहनक्षमतेत वाढ

मिठी नदीची वहन क्षमता वाढवण्याचे काम प्राधान्याने करण्यात आले. नदीची क्षमता दुपटीने वाढली आहे. नदीचे रुंदीकरण, गाळ काढणे, संरक्षण भिंत उभारणे ही कामे सुरू आहेत. भिंत उभारणीचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे, तर इतर कामे 90 टक्के पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेगाने होणार आहे. एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिकेचा मिळून यासाठी 1 हजार 250 कोटी रुपये खर्च झाला असल्याचे तनपुरे म्हणाले.