
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबई महानगरपालिकेतर्फे गोरेगावमध्ये वयोवृध्दांसाठी वृध्दाश्रम आणि नोकरदार महिलांच्या सोयीसाठी वसतीगृह उभारले जाणार आहे. त्यासंदर्भात आज घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत शिवसेना नेते, उद्योगमंत्री, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केले.
नोकरदार महिलांसाठी गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील महापालिकेच्या भूखंडावर वसतीगृह उभारले जाणार आहे. या १७ मजली इमारतीमध्ये ३५० महिलांना राहण्यायोग्य १७० खोल्या तसेच सभागृह, स्वयंपाकघर आणि पाळणाघर अशा सुखसोयी करण्याबद्दल सुभाष देसाई यांनी सूचना केल्या. गोरेगाव पूर्वेच्या जयकोच येथील पालिकेच्या भूखंडावर १०० वयोवृध्द नागरिकांसाठी वृध्दाश्रम उभारला जाणार आहे. या वृध्दाश्रमातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पालिकेकडून पुरवल्या जातील. वसतीगृह आणि वृध्दाश्रमाला अद्ययावत सोयीसुविधा पुरवल्या जाव्यात असेही देसाई यांनी सुचवले. याप्रसंगी पालिका स्थापत्य समिती अध्यक्षा साधना माने, पालिका उपायुक्त किरण आचरेकर, उपायुक्त डॉ. संगीत हसनाळे, सहाय्यक आयुक्त चंदा जाधव, कार्यकारी अभियंता संजय पंडीत आदी उपस्थित होते.



























































