
मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात पालिकेने वसुलीसाठी जोरदार कारवाई सुरू केली असून 8 मार्च रोजी एकाच दिवसात 416 कोटी वसूल केले आहेत. आतापर्यंत मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत 3 हजार 486 कोटी रुपये जमा झाले आहेत. आगामी काळात वसुलीची कारवाई वाढवण्यात येणार आहे.
कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नाला फटका बसला असताना थकीत मालमत्ता कर थकबाकीमुळे पालिकेला नुकसान होत आहे. मोठी थकबाकी राहिल्याने पालिकेने वेगाने वसुली सुरू केली आहे. मार्चअखेरपर्यंत 5200 कोटी वसुलीचे लक्ष्य ठेवून काम करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार वसुली करताना 8 मार्च या शेवटच्या दिवशी 416 कोटी रुपये जमा करण्यात आले.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा तातडीने व वेळेत करावा, जेणेकरून थकीत मालमत्ता कर रकमेवर दरमहा 2 टक्के रकमेची दंडात्मक आकारणी, जल जोडणी खंडित करणे, चल संपत्ती जप्त करणे, अटकावणी करणे यांसारखी कारवाई टाळता येईल, असे आवाहन कर व संकलन खात्याचे सहआयुक्त सुनील धामणे आणि सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी करदात्यांना केले आहे.

























































