पालिका आयुक्तांचा कामाचा धडाका सुरूच, प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येकाची स्क्रिनिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेचे नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबई महानगरपालिकेची धुरा हाती घेतल्यानंतर कोरोना रोखण्यासाठी कामांचा धडाका लावला असून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये पालिकेने जाहीर केलेल्या २६४६ प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येकाची स्क्रिनिंग, कंटेनमेंट झोनमध्ये तात्पुरत्या स्वरूपात ‘कोविड योद्ध्यां’ची समन्वयक म्हणून नियुक्ती आणि १०० कोविड केअर सेंटरवर २०० रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. पालिका आयुक्तांनी पावसाळापूर्व सर्व कामांचा सविस्तर आढावाही घेतला आहे.

पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. वॉर्डच्या सहायक आयुक्तांनी सध्या त्या वॉर्डच्या ‘आयुक्त’ असल्याच्या भूमिकेतून, सूक्ष्म नियोजन करून काम करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ‘कॉटॅक्ट ट्रेसिंग’ सध्या बाधित रुग्णाच्या प्रमाणात तीन असे आहे. हे प्रमाण दुप्पट करून सहा असे करावे असे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. झोपडपट्ट्या आणि इतर भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संबंधितांचे प्रभावी क्वारेंटाइन करावे असेही आयुक्तांनी सांगितले. प्रभावी कामासाठी सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागातील अधिकार्‍यांवर कामाचे वाटप करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवावे असे आदेशही आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी, पी. वेलरासू, उपायुक्त रमेश पवार, चंद्रशेखर चोरे आदी, विशेष अधिकारी प्राजक्ता लवंगारे आदी उपस्थित होते.

प्रत्येक वॉर्डमध्ये स्वत: जाऊन आढावा घेणार

सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागात असणार्‍या रुग्णालयांच्या सुविधांवर लक्ष ठेवावे, वेळोवेळी आढावा घ्यावा असे निर्देशही आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. एखाद्या विभागात बेड कमी असल्यास जादा बेड असलेल्या विभागात संशयित, रुग्णांना स्थलांतरित करावे, बेडची संख्या वाढवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावे असेही आयुक्त इकबाल सिंग चहल म्हणाले. वॉर्डमध्ये काम करताना लोकप्रतिनिधींची सहकार्य घ्यावे, मुंबई पोलीस, मुंबईतील शासकीय-निमशासकीय संस्थांशी संपर्क-समन्वय साधून काम करावे असे निर्देशही त्यांनी दिले. पालिकेच्या सर्व २४ वॉर्ड विभाग कार्यालये, परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन स्वत: आढावा घेणार असल्याचेही यावेळी आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले.