शिवसेनेच्या मोर्चामुळे तंतरली, सारवासारव करताना चहल यांची फे फे उडाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोटय़वधीच्या भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी काढलेल्या शिवसेनेच्या महामोर्चामुळे महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. मुख्य म्हणजे मुदत ठेवी 5 हजार कोटींहून जास्तीने घटल्या असतानाही त्या वाढल्या असल्याची माहिती आयुक्त चहल यांनी दिली.

पालिकेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेनेचे भगवे वादळ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी महापालिका मुख्यालयावर धडकले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला पाच प्रश्न विचारले. रस्त्यांच्या पाच हजार कोटींच्या कामांचा खर्च सहा हजार कोटींवर कसा गेला, रस्त्यांसाठी पुरवण्यात येणाऱया खडी पुरवठय़ाचे कंत्राट एकाच कंत्राटदाराला का दिले, स्ट्रीट फर्निचर उपक्रमात 13 प्रकारची कामे एकाच कंत्राटदाराने करण्याची अट का घातली, शिवसेनेच्या कार्यकाळात तोटय़ात असणारी महापालिका 90 हजार कोटी फायद्यात आली असताना का लुटता? मुंबईच्या सुशोभीकरणात, सॅनिटरी वेंडिंग मशीनमध्ये किती कोटींचा घोटाळा झाला, असे पाच सवाल केले होते. या पाच प्रश्नांना आज आयुक्त आणि प्रशासक इकबालसिंह चहल यांनी उत्तरे दिली.

मुदत ठेवी घटल्याचा उल्लेख टाळला

मुंबई महापालिकेचा कारभार हाती घेतल्यापासून महापालिकेच्या मुदत ठेवी वाढल्या आहेत, असे प्रशासक इकबालसिंह चहल यांनी सांगितले. 2020 ला 79 हजार 115 कोटींच्या मुदत ठेवी आता 91 हजार 690 कोटींवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गेल्या चार महिन्यांत विविध विकासकामांसाठी मुदत ठेवीतील 5 हजारांहून जास्त कोटींची रक्कम वापरण्यात आली आहे. त्यामुळे मुदत ठेवीत घट झाली आहे. मात्र, हा उल्लेख चहल यांनी टाळला.

पत्रकारांनी चहल यांना मराठीत बोलायला भाग पाडले

पत्रकार परिषद सुरू करताना चहल यांनी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. त्याच बरोबर सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी एकसुरात चहल यांनी आधी मराठीत बोला आणि नंतर इतर भाषेत सुरुवात करा, असे ठणकावले. त्यामुळे चहल यांनी गपगुमान पत्रकार परिषदेची सुरुवात मराठीत केली.मुख्यालयात रविवारी पत्रकार परिषद ही आयुक्तांची मनमानी

आदित्य ठाकरे यांचा मोर्चा शनिवारी झाला. त्यामुळे प्रशासक चहल यांना ही पत्रकार परिषद शनिवारी मोर्चानंतर संध्याकाळी घेता आली असती किंवा प्रेसनोट काढून देता आली असती; पण तसे न करता मिंधे सरकारच्या आदेशाने आज महापालिकेला सुट्टी असताना आयुक्तांनी मुख्यालयाचे दालन उघडले. चहल यांनी आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचा आव आणत मुख्यालयातील दालनात आज तडकाफडकी पत्रकार परिषद घेतली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी अशा प्रकारे आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. ‘

तंत्रज्ञानाचे नाव सांगत अचानक कंत्राटदार बदलले
मुंबईतील रस्ते विकासाचे काम गेली अनेक वर्षे करणाऱया कंत्राटदारांना न देता नवे तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते बांधण्याचा अनुभव असलेल्या कंत्राटदारांना काम देण्यात आले, अशी माहिती चहल यांनी दिली. मात्र, ही प्रक्रिया आता राज्यात मिंधे सरकार सत्तेवर आल्यावरच का सुरू करण्यात आली आणि तंत्रज्ञान व अनुभवाचे नाव सांगत कंत्राटदार का बदलले, याचे उत्तर चहल यांनी दिले नाही.