यापुढे स्विकृत नगरसेवकांना वैधानिक समित्यांवर संधी नाही; पालिका सभागृहात ठराव मंजूर

bmc-2

पालिकेच्या वैधानिक समित्यांवर यापुढे स्विकृत नगरसेवकांना घेता येणार नाही. याबाबत पालिकेच्या महासभेत शिवसेनेने मांडलेला ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. शिवाय स्थायी समितीवर भाजपने नियुक्ती केलेल्या भालचंद्र शिरसाट यांचे सदस्यत्व रद्द करण्यावरही महासभेत बहुमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

महापालिका कायद्यानुसार वैधानिक समित्यांवर स्विकृत नगरसेवकांची नेमणूक करता येत नसल्यामुळे कायद्यानुसार भाजपने स्थायी समितीवर नियुक्ती केलेले भालचंद्र शिरसाट यांचे सदस्यत्व रद्द करावे असा ठराव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडला. शिवाय यापुढे वैधानिक समित्यांवर स्विकृत नगरसेवकांची नेमणूक करू नये असेही जाधव यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यशवंत जाधव यांच्या ठरावाला अनुमोदन दिले. याशिवाय राष्ट्रवादी, समाजवादी पक्षानेही शिवसेनेच्या ठरावाला पाठिंबा दिला. त्यामुळे ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केले. दरम्यान, शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यपद रद्द झाल्यामुळे भाजपला चांगलाच दणका मिळाला आहे. मात्र सभागृह आणि स्थायी समितीचा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या