
बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतील गोंधळाची मालिका सायंकाळपर्यंत सुरुच राहिली. अनेक मतदारांना मतदानाचा हक्क न बजावताच माघारी परतावे लागले. जोगेश्वरी पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 77 अंतर्गत लालजी टेक्निकल स्कूलच्या मतदान केंद्रावर एका मतदाराला सायंकाळी 5.30 वाजताची वेळ संपल्याचे सांगून चुकीच्या पद्धतीने मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. वास्तविक तो मतदार सायंकाळी 5.30 वाजण्यापूर्वीच मतदान केंद्रावर पोहोचला होता. मतदान अधिकाऱ्याच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे तो नागरिक मतदानापासून वंचित राहिला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतरही मतदान करु न दिल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
जोगेश्वरी पूर्वेकडील सर्वोदयनगर येथील लालजी टेक्निकल स्कूलमध्ये प्रभाग क्रमांक 77 मधील निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. या केंद्रावर सायंकाळी 5.30 वाजण्याची डेडलाईन संपण्यापूर्वी एक मतदार आला होता. त्या मतदाराकडे ओरिजिनल आधार कार्ड नव्हते. त्याला मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी ओरिजिनल आधार कार्ड घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार तो मतदार गडबडीने घरी गेला आणि ओरिजिनल आधार कार्ड आणले. यादरम्यान सायंकाळी 5.30 वाजताची वेळ संपल्याचे कारण देऊन मतदान केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. नंतर मतदाराने संबंधित अधिकाऱ्याला विनंती करुनही मतदानासाठी आत घेण्यात आले नाही. विशेष म्हणजे, त्याच अधिकाऱ्याने त्याला आधार कार्ड घेऊन येण्यास सांगितले होते. त्यावरुन स्थानिक नागरिक संतप्त झाले होते. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या रहिवाशांना शांत केले.






























































