
पश्चिम उपनगरात गोरेगाव आणि मालाड परिसरात ठाकरेंचा दबदबा कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनेने गोरेगाव आणि मालाड परिसरातील आपला बालेकिल्ला अभेद्य राखला. मतदारांनी मराठी अस्मिता जपणाऱ्या ठाकरे बंधूंना साथ दिल्यामुळे पी पूर्व आणि पी दक्षिण विभागांतर्गत येणाऱया प्रभागांमध्ये शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला, तर गद्दारांची पुरती धुळधाण उडाली.
प्रभाग क्रमांक 37 मधून निवडणूक लढवलेल्या शिवसेनेच्या योगिता कदम यांनी तब्बल 10,981 मते मिळवून जबरदस्त विजय मिळवला. त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या भाजपच्या प्रतिभा शिंदे यांचा दारुण पराभव झाला. प्रभाग क्रमांक 38 मध्ये मनसेचे इंजिन धडाडले आणि शिंदे गटाचा डाव धुळीस मिळाला. मनसेच्या सुरेखा परब यांनी 11,226 मते मिळवली. या प्रभागात शिंदे गटाच्या रिशीता चाचे यांना अवघ्या 7953 मतांवर गाशा गुंडाळावा लागला. प्रभाग क्रमांक 39 मध्येही शिवसेनेची ‘मशाल’ धगधगली. मतदारांनी पुन्हा एकदा शिवसेनेलाच साथ देत पुष्पा कळंबे यांना 6411 मतांनी विजयी केले. येथे शिंदे गटाच्या विनया सावंत यांचा दारुण पराभव झाला.
प्रभाग क्रमांक 40 मध्ये शिवसेनेचे तुळशीराम शिंदे 9263 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी भाजपच्या संजय आव्हाड यांना पराभूत केले. शिवसेनेची हीच जादू शेजारील प्रभाग क्रमांक 41 मध्येही दिसली. या प्रभागातून शिवसेनेचे अॅड. सुहास वाडकर 7196 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी शिंदे गटाच्या मानसी पाटील यांना पराभूत केले. मतमोजणीदरम्यान अॅड. वाडकर यांनी सुरुवातीच्या फेरीपासून आघाडी मिळवली होती.
सोनाली सावेंची शिंदे गटाला धोबीपछाड, प्रभाग क्रमांक 83 मधून विजयी
शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 83 मधील उमेदवार सोनाली सावे यांनी शिंदे गटाच्या उमेदवार निधी सावंत यांना धोबीपछाड देत विजय मिळवला. या प्रभागातून काँग्रेस, राष्ट्रवादी वादी काँग्रेसने (अजित पवार गट) उमेदवारी देत नशिब आजमवले. आम आदमी पार्टीचा उमेदवारही रिंगणात होता तर तीन अपक्ष उमेदवार लढतीत होते. मात्र 6691 मते मिळवत सावे यांनी शिवसेनेचा गड राखला. निधी सावंत यांना 5 हजार 654 मते मिळाली.
गितेश राऊत 11 हजार मतांनी विजयी
शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत यांनी 11 हजार 257 मते मिळवत शिंदे गटाचे उमेदवार राजेश नाईक यांचा पराभव केला. या प्रभागात नऊ अपक्ष उमेदवार होते, तर काँग्रेसनेदेखील येथे उमेदवार दिला होता. माजी खासदार विनायक राऊत यांचा दांडगा जनसंपर्क व गितेश यांनी केलेल्या बांधणीने शिवसेनेची मशाल येथे धगधगली. शिंदे गटाचे उमेदवार राजेश नाईक यांना नऊ हजार मतांवर रोखत गितेश राऊत यांनी विजय मिळवला.
विजय शिवशक्तीचा, कार्यकर्त्यांचा
गितेश यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी मोठय़ा प्रमाणात जल्लोष केला. गुलाल उधळत ‘आवाज फक्त शिवसेनेचा’ अशा घोषणा देण्यात आल्या. हा विजय शिवशक्तीचा, कार्यकर्त्यांचा असल्याची प्रतिक्रिया गितेश यांनी दिली.





























































