
मुंबई महापालिका कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने होणार आहे. ही वाढ पूर्णकालीन कर्मचाऱयांसह निवृत्तीवेतनधारक कर्मचारी, वैद्यकीय व अभियांत्रिकी कर्मचारी यांना लागू राहणार आहे. कर्मचाऱयांना आधी 31 टक्के महागाई भत्ता होता तो आता 34 टक्के मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे, हा महागाई भत्ता सुधारित आहे. हा महागाई भत्ता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना लागू राहणार आहे. मात्र, माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुज्ञेय असणाऱया माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना लागू असणार नाही. जानेवारी ते मार्च 2022 या महिन्याच्या थकबाकीसह एप्रिल महिन्याचा महागाई भत्ता कर्मचाऱयांना एप्रिल 2022 च्या मासिक वेतनासोबत देण्यात येणार आहे. महागाई भत्त्याची रक्कम निश्चित करताना सुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन विचारात घेण्यात येणार आहे. विशेष भत्ता व अन्य कोणत्याही नावाने वेतनात समाविष्ट होणारी रक्कम विचारात घेण्यात येणार नाही.























































