पालिकेच्या अभियांत्रिकी, प्रकल्प संचालकपदी पहिल्यांदाच महिला

मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत तब्बल 36 वर्षे प्रदीर्घ सेवा बजावलेल्या अर्चना आचरेकर यांची पालिकेच्या अभियांत्रिकी, प्रकल्प संचालकपदी नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती झाली आहे.

अर्चना आचरेकर या जानेवारी 1984 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत दुय्यम अभियंता म्हणून रुजू झाल्या. यानंतर पालिकेतील आपल्या कारकीर्दीत त्यांनी विविध खात्यांतील अनेक पदांवर काम केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळेच पालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी पालिकेची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. यापूर्वी आचरेकर या पालिकेच्या ‘नगर अभियंता’ (सिटी इंजिनीअर) म्हणून कार्यरत होत्या. अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया घालणाऱया मुंबईतील ‘वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट’ येथून अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांनी पालिकेची सेवा पत्करली. अर्चना आचरेकर या मूळच्या सिंधुदुर्गच्या मालवणमधील आहेत.

मुंबईकरांना दर्जेदार, अद्ययावत सेवा हेच उद्दिष्ट!
अभियांत्रिकी आणि प्रकल्प संचालकपदी नियुक्ती झालेल्या आचरेकर यांच्याकडे सध्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादींची जबाबदारी राहणार आहे. मुंबईकरांना या सुविधा दर्जेदार आणि अद्ययावत देण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणार असल्याचे आचरेकर म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या