
एकेकाळी 91 हजार कोटींच्या वर असलेल्या मुंबई पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये सातत्याने घट होत आहे. विविध बँकांमध्ये असलेल्या या मुदत ठेवी गेल्या चार वर्षांत 81 हजार कोटींवर घसरल्या होत्या. त्यात पुन्हा एकदा 4109 कोटी रुपयांची घट झाली आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या नोंदीनुसार, फेब्रुवारी 2026 अखेर मुदत ठेवींची रक्कम 81 हजार 919 कोटी 71 लाख रुपये होती. पालिकेने या ठेवी विविध बँकांमध्ये 6.30 टक्के ते 7.40 टक्के व्याजदराने काही वर्षांच्या मुदतीत ठेवल्या आहेत. मात्र एप्रिल 2026 अखेर ती 77 हजार 810 कोटी 55 लाख रुपयांवर आली आहे. म्हणजेच केवळ दोन महिन्यांत 4 हजार 109 कोटी 16 लाख रुपयांची घट झाली आहे.
2026-27 चा 80 हजार 952 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुदत ठेवींमध्ये कोणतीही घट झालेली नसल्याचे स्पष्ट केले होते, मात्र त्यानंतरच्या मासिक आर्थिक अहवालात मुदत ठेवींची रक्कम लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून या मुदत ठेवींमधूनच प्रकल्पांसाठीचा निधी खर्च केला जात आहे.
महसूल वाढ न झाल्याने ठेवी मोडण्याची वेळ
पालिकेकडे 2021-22 मध्ये तब्बल 91 हजार 690 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. त्यानंतर मोठय़ा प्रमाणात विविध विकासकामांवर खर्च वाढत गेला. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेतन व इतर आर्थिक दायित्वे पूर्ण करण्यासाठीही निधी खर्च करण्यात आला. महसूलवाढ अपेक्षित प्रमाणात न झाल्याने मुदत ठेवी मोडण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.






























































