
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी तिसऱया लाटेचा इशारा देण्यात आल्यामुळे पालिकेने आपली संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नव्याने होणाऱया चार जम्बो कोविड सेंटरमध्ये दहा हजार बेड तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये 70 टक्के ऑक्सिजन बेड असतील तर एक हजार आयसीयू बेड तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्यात येत आहे.
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाच्या दोन लाटा नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र आगामी काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाटही येण्याचा इशारा आरोग्यतज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेतर्फे आगामी काळात वेगाने उपाययोजना करण्यात येत आहेत. तिसऱया लाटेत मोठय़ा संख्येने रुग्ण वाढल्यास पालिकेला यंत्रणा उभारण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये नवीन जम्बो कोविड सेंटर अवघ्या काही दिवसांत उभारता येतील असे नियोजन करण्यात येईल. याआधी उभारण्यात आलेली जम्बो कोविड सेंटर अवघ्या 15 ते 20 दिवसांत उभारण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली असून यंत्रणा तयार ठेवून गरजेनुसार वेगाने कोविड सेंटर उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
मालाड, रेसकोर्स, कांजूरमार्ग, भायखळ्याला जम्बो सेंटर
पालिकेकडे सध्या गोरेगाव नेस्को, बीकेसी, एनएससीआय वरळी, दहिसर दोन, मुलुंड अशा ठिकाणी सहा जम्बो कोविड सेंटर आहेत. यामध्ये सुमारे 22 हजार बेड आहेत. मात्र संभाव्य तिसऱया लाटेत दररोज सुमारे 10 ते 12 हजार रुग्ण आढळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ऑक्सिजन बॅकअप सुविधा ठेवणार
कोरोनाच्या दुसऱया लाटेत व्हायरसने बदललेल्या स्ट्रेनमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याचे प्रमाण वाढून रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे पालिका सतर्क झाली असून ऑक्सिजनची बॅकअप सुविधा ठेवून काम केले जाणार आहे. दुर्घटना टाळण्यासाठी ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर, टर्बे सिलिंडर बॅकअपसाठी ठेवले जाणार आहेत. शिवाय प्रत्येक जम्बो सेंटरमध्ये पेडियाट्रिक वॉर्डही असेल.
त्या दृष्टीने दररोज लागणाऱया बेडच्या गरजेनुसार संपूर्ण कालावधीसाठी सुमारे एकूण 30 हजार बेड लागतील. त्यामुळे नव्या चार जम्बो कोविड सेंटरमुळे दहा हजार बेड वाढल्याने ही गरज पूर्ण होणार आहे. यामध्ये मालाड, रेसकोर्स महालक्ष्मी, कांजूरमार्ग आणि भायखळा येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येतील.





























































