लसीकरण केंद्रांत राजकीय फलक, होर्डिंगला बंदी; मुंबई पालिकेने जारी केल्या गाईडलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी आणि लसीकरणाची गती वाढवण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि खासगी रुग्णालयांच्या मदतीने लसीकरण सुरू आहे. मात्र, या सर्व लसीकरण केंद्रांमध्ये आणि बाहेर होणाऱया राजकीय प्रचाराला आळा घालण्यासाठी पालिकेने आज नव्या गाईडलाइन जारी करत लसीकरण केंद्रांत राजकीय फलक, पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग, भित्तीपत्रकाला बंदी घातली आहे. बंदीचे उल्लंघन केल्यास त्या केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी याबाबत नव्या गाईडलाईन आज जारी केल्या.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देत आहेत. मुंबईत पालिका, राज्य सरकार तसेच खासगी रुग्णालयांच्या मदतीने लसीकरण केंद्रे सुरू आहेत. मात्र, लसीकरण केंद्रांच्या आत आणि बाहेर लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय कुरघोडय़ा सुरू आहेत. याकडे मुंबई महापालिकेने वारंवार लक्ष वेधून लसीकरण केंद्रांचा राजकीय वापर करू नका, अशी सूचना केली होती. मात्र, त्यानंतरही हा प्रकार न थांबल्यामुळे महापालिका आयुक्तांनी आज आदेश जारी केले.

खासगी लसीकरणासाठी करार करणे बंधनकारक

खासगी रुग्णालयांच्या मदतीने कार्यालये, गृहनिर्माण संस्था तसेच गृहनिर्माण संकुलांमध्ये करण्यात येणाऱया लसीकरणाबाबतही कठोर भूमिका घेतली असून रुग्णालय आणि संबंधित कार्यालय, गृहनिर्माण संस्थेने सामंजस्य करार करणे बंधनकारक असून त्यात वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक उल्लेख स्पष्टपणे करणेही अनिवार्य केले आहे.