
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कांदिवली, मालाडमध्ये कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आली आहे. कांदिवलीत 14 तर मालाडमध्ये 13 असे एकूण 27 कृत्रिम तलाव निर्माण करण्यात येत आहेत. मालाडमध्ये फिरत्या विसर्जन तलावांचीही सोय करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी खबरदारी घेऊन सरकार-पालिकेने घालून दिलेले नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. यामध्ये आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी उत्तर मुंबईतील कांदिवली, मालाडमध्ये कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर मालाड, कांदिवलीत कृत्रिम तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कृत्रिम तलावातच मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन सुधाकर सुर्वे यांनी केले आहे. शिवसेना नगरसेविका शुभदा गुढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. 19 मधील सेक्टर 1 व सेक्टर 2 येथे कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी गणेशमूर्ती विसर्जन कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येत आहे. शाखाप्रमुख निखिल गुढेकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
गणेशभक्तांनी सहकार्य करावे!
गणेशभक्तांच्या सुविधेसाठी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मालाडमध्येही ‘फिरते विसर्जन तलाव’ सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना त्यांच्या सोसायटीच्या दारावरच वाहनातील स्वच्छ पाण्याच्या फिरत्या विसर्जन तलावात आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करता येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी फिरते विसर्जन तलाव आणि कृत्रिम तलावांनाच प्राधान्य देऊन पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पी-उत्तरचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी केले आहे.

























































