पुढच्या पावसापर्यंत मुंबईत पाण्याचे टेन्शन नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱया सातही तलावक्षेत्रात सध्या धुवाधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची चिंता मिटत आहे. आज 19 ऑगस्ट रोजी सातही धरणांत 12 लाख 18 हजार 880 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हे पाणी पुढील 11 महिने म्हणजेच जून 2022पर्यंत पुरणारे आहे. दरम्यान, सातही धरणांत एकूण 84.21 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 63 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आता मात्र जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात धरणांपैकी तुळसी तलाव 16 जुलै, विहार तलाव 18 जुलै, मोडक सागर व तानसा 22 जुलैला ओसंडून वाहू लागले आहेत. तर सद्यस्थितीत जोरदार पाऊस सुरू असल्याने उर्वरित मोठे तीन तलाव लवकरच ओव्हरफ्लो होतील, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

तीन वर्षांतील 19 ऑगस्टचा पाणीसाठा

दशलक्ष लिटर

  • 2021 12,18,880
  • 2020 12,32,302
  • 2019 13,64,502

तलावातील जलसाठा दशलक्ष लिटरमध्ये

  • अप्पर वैतरणा 162349
  • मोडक सागर 113506
  • तानसा 144593
  • मध्य वैतरणा 174147
  • भातसा 588541
  • विहार 27698
  • तुळशी 8046