
आता झुकाल तर मुंबईला मुकाल, मुंबई आपली आहे, ती आपल्याच ताब्यात ठेवा, अशी कळकळीची साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठी माणसाला घातली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती पैशांचा वारेमाप वापर करतेय, पण विजय शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस शिवशक्तीचाच होईल, असा दृढविश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज आणि उद्या कोणी पैसे वाटताना दिसला तर बेलाशक वाट्टेल ते करा, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.
उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई विमानतळ परिसरातील शिवसेनेच्या शाखांसह मुंबईतील शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस शिवशक्ती युतीच्या अनेक उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयांना भेटी दिल्या. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी काय काळजी घ्यायची यासंदर्भात त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
भाजप व एकनाथ शिंदे गटाकडे सांगण्यासारखे काही नाही, पण वाटण्यासारखे बरेच काही आहे. आता त्यांना पैसे वाटतानाही पराभवाची भीती वाटत आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आज आणि उद्या कुणी पैसे वाटताना दिसला, तर बेलाशक वाट्टेल ते करा, संबंधिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्या, असा आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिला.
गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी विजय हवा
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कसे जगायचे? हे शिकवले. पण शिवाजी महाराजांचा झाकलेला पुतळा पाहून आपण ही निवडणूक कुणाविरोधात लढवत आहोत हे दिसून येत आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजप महायुतीवर निशाणा साधला. आज आपल्या दैवतांचे पुतळे झाकले जात आहेत, आपली अस्मिता मारण्याचा प्रयत्न होत आहे, मातृभाषा मराठीवर आक्रमण होत आहे. या गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी शिवशक्ती युतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीची जाहीर सभा छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये सोमवारी झाली. त्या सभेत माणसे कमी आणि रिकाम्या खुर्च्याच जास्त होत्या. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांनीही त्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले, खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, असा मिश्कील टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
आमिषाला बळी पडू नका
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या एक-दोन दिवसांपासून पैशांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. मतदार आणि उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही शिवसेनेने केलेली कामे घेऊन मतदारांना सामोरे जात आहोत. महायुती मात्र पैशांचे आमिष दाखवून आमच्या उमेदवारांना माघार घेण्यास सांगत आहे, असे ते म्हणाले. आमिषाला बळी पडून दोन-पाच हजारांसाठी स्वतःचे आयुष्य विकू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

































































