
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा इशारा आरोग्यतज्ञांकडून देण्यात आल्यामुळे पालिकेने आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रत्येक जम्बो कोविड सेंटरमध्ये दोन बालरुग्णांसाठी दोन वॉर्ड सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी पालकही मुलांसोबत राहू शकणार असून मुलांच्या मनोरंजनासाठी वॉर्डमध्ये खेळणी, भिंतीवर कार्टून्स रेखाटण्यात येणार आहेत.
मुंबईत कोरोनाच्या दुसऱया लाटेवर पालिकेने प्रभावी उपाययोजना करून आता चांगलेच नियंत्रण मिळवले आहे. मात्र काही दिवसांतच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्ताविण्यात आल्यामुळे पालिकेचे आव्हान वाढले आहे. त्यामुळे पालिकेने पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या निर्देशानुसार वेगाने आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या सहा जम्बो कोविड सेंटरमध्ये ही व्यवस्था केली जाणार असून आगामी काळात उभारल्या जाणाऱया चार नव्या जम्बो कोविड सेंटरमध्ये बालरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहेत.
अशी असणार व्यवस्था
- कोरोनाबाधित मुलांचे शून्य ते 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटानुसार सहा गट तयार करून पालकांना मुलांसोबत राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
- सुरुवातीला मालाड, गोरेगाव, शीव, गोरेगाव या ठिकाणच्या सेंटरमध्ये मुलांसाठी विशेष वॉर्ड सुरू होईल. शिवाय पालिकेच्या 28 प्रसूतीगृहांमध्येही ही सुविधा असेल.
- मूल असल्यास सोबत राहण्याची व्यवस्था असेल. तर ठरावीक वयोगटानुसार दुरून नजर ठेवण्याचीही सोय केली जाईल. यामध्ये निकट संपर्क टाळण्याची खबरदारीही घेतली जाईल.
अंधेरीत अभिनव उपक्रम सुरू
के पश्चिम अंधेरी (पश्चिम) येथे 140 ऑक्सिजन बेड असलेल्या कोरोना केअर सेंटरचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या प्रयत्नातून ‘डॉक्टर फॉर यू’ संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठीही विशेष वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. या 30 बेडच्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी, मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जम्बो कोविड सेंटरमध्ये 25 ते 50 बेड कोरोनाबाधित लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येतील. गरजेनुसार बेड वाढवता येतील. या ठिकाणी आवश्यक खबरदारी घेऊन पालकांनाही सोबत राहण्याची व्यवस्था असेल.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त



























































