लस उपलब्ध झाल्यापासून 24 तासांत लसीकरण, पालिका सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनावरील लस प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत प्रत्यक्ष लसीकरण सुरू करता येईल इतकी सुसज्जता महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर लसीकरण पूर्व तयारीमध्ये कोणतीही उणीव, कमतरता राहू नये याची पुन्हा खातरजमा करण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

काकाणी यांनी आज कांजूरच्या प्रादेशिक लस साठवणूक केंद्रासह (कोल्ड स्टोरेज) विविध रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांनादेखील भेट दिली. तांत्रिक बाबींची पूर्तता, मनुष्यबळ उपलब्धता, प्रशिक्षण यासह निरनिराळ्या बाबींवर त्यांनी यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देऊन आढावा घेतला. महानगरपालिका प्रशासनाकडून कोरोना लसीकरण पूर्वतयारी वेगाने करण्यात येत आहे.

मुंबईत कृती दलाने ठरवलेल्या कार्यक्रमानुसार ही कार्यवाही सुरू आहे. लसीकरणासाठी परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रुझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही 8 लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. कांजुरमार्ग येथे पालिका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 5 हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लस साठकण्यासाठी केकळ प्रादेशिक लस साठवणूक केंद्र (आरव्हीएस) म्हणून ओळखली जाणार आहे. आढावा दौऱयात उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर, संचालक (वैद्यकीय शिक्षण क प्रमुख रुग्णालय) डॉ. रमेश भारमल, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.