शाळा सुरू करण्यासाठी पालिका सज्ज; 1159 शाळा, 500 इमारतींचे दोन दिवसांत सॅनिटायझेशन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
school

राज्य सरकारने पहिलीपासूनच्या शाळा बुधवार, 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागानेही आवश्यक तयारीसाठी नियोजन केले आहे. यामध्ये 1159 शाळांच्या सुमारे 500 इमारती दोन दिवसांत सॅनिटायझेशन करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत मास्क, हात धुण्यासाठी साबण आणि गेटवर स्क्रिनिंगची व्यवस्थाही केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

कोरोना नियंत्रणात आल्यापासून राज्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. यानंतर ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून विचारविनिमय सुरू होता. याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आपल्या शाळा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

अशी आहे आकडेवारी

पालिकेच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या एकूण 1159 शाळा आहेत. यामध्ये 2,92,784 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. n तर खासगी अनुदानित 393 तर खासगी विनाअनुदानित 667 शाळा आहेत.  n पालिकेच्या शाळांमध्ये आठवी ते दहावीपर्यंतच्या वर्गात 71923 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
तर पहिली ते सातवीपर्यंत सुमारे 2,20,861 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

कोरोना नियम अंमलबजावणीबाबत लवकरच निर्णय

मुंबईत पालिकेच्या आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करताना पालकांचे संमतीपत्र असले तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. शिवाय सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शाळेत न बोलावता गट करून किंवा तर काही शाळा-कॉलेज व्यवस्थापनांनी एक दिवसाआड, शाळांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येत आहे. मात्र पहिलीपासून शाळा सुरू होत असताना नेमके नियोजन शासनाच्या निर्देशानुसार लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

शाळा सुरू झाली… समाधान आणि चिंताही…

तब्बल दीड वर्षानंतर पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शाळेअभावी लेखनाची सवय मोडलेल्या तसेच आजतागायत सोयीसुविधांअभावी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. काही पालकांनी तर आतापासूनच शाळेत गेल्यावर सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरच्या वापराचे पाल्यांना धडे देण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे काही जणांनी कोरोना प्रतिबंधक लस नसल्याने मुलांना शाळेत पाठविण्यास अनेक पालक तयार नाहीत.

पहिली, दुसरीच्या बहुसंख्य पालकांनी सध्या तरी ऑनलाइन शिक्षणाला पसंती दिली आहे. ऑफलाइनबरोबच ऑनलाइन शिक्षणही सुरू असल्याने सध्या तरी पाल्याला शाळेत पाठविण्याची घाई करायला नको, अशी भूमिका शाळांनी घेतली आहे. शाळा सुरू होणार असली तरी पालकांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. सुरुवातीला एक-दोन आठवडे अंदाज घेऊन हळूहळू पाल्याला पाठविण्याचा विचार काही पालकांनी बोलून दाखवला आहे. तर काही पालकांनी लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस आल्यावरच शाळेत पाठविण्याची भूमिका घेतली आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची पालकांवर सक्ती

राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यास कोरोना टास्क फोर्सने हिरवा कंदील दिला आहे, मात्र प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना वर्गात शिकविण्याबरोबरच ऑनलाइन वर्ग घेण्यास शिक्षक नाखूश आहेत.

कोरोना प्रादुर्भावामुळे शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळांनी हमीपत्र घ्यायचे आहे. पालकांची संमती असेल तर विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश मिळणार असून शाळेत न येणाऱया विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. ऑफलाइनबरोबरच ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्यास शाळांची तयारी नसून सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्ग भरविण्याचा विचार शाळा करीत आहेत.

एकच धडा दोनदा शिकवावा लागतो

मुंबईतील शाळांमध्ये नोकरी करणारे अनेक शिक्षक ठाणे, नवी मुंबईतून येतात. त्यांचा अर्धा वेळ हा प्रवासातच जातो. शाळेत आल्यावर शिक्षकांना वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद ठेवणे, शालेय उपक्रम राबविणे, परीक्षा घेणे अशी कामे करण्याबरोबरच ऑनलाइन वर्गदेखील घेणे शिक्षकांना कठीण जात आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वागताला शाळा सज्ज

पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाऱया विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा आतापासूनच तयारीला लागल्या आहेत. शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षकांचे थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर्स, मास्कचा वापर बंधनकारक असणार असून काही दिवस तरी सामूहिक खेळांवर बंदी असणार आहे. विग्योबर स्कूलचे सीईओ मनीष रस्तोगी यांनी सांगितले, पालकांनी संमतीपत्र दिले असेल तरच विद्यार्थ्यांना वर्गात जाण्याची परवानगी दिली जाईल. शाळेत येणाऱया सर्व विद्यार्थ्यांना मास्क घालणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबात कोरोना रुग्ण आढळल्यास अशा विद्यार्थ्यांना घरातून अभ्यास सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जाईल.

ऑफलाइनबरोबर ऑनलाइन वर्ग घेण्यास येणाऱया अडचणी

  • वेळेचे गणित जुळत नाही. ऑफलाइन वर्गांना जास्त वेळ द्यावा लागतो.
  • कधी कधी ऑनलाइन वर्गाकडे दुर्लक्ष होते. नेटवर्कच्या समस्या निर्माण होतात.
    शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने काही विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइनचे आयोजन परवडत नाही.
  • ऑनलाइनमधून शिकविण्याच्या मर्यादा असल्याने संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात.

 दक्षिण मुंबईतील अनेक शाळा पालकांवर संमतीपत्र भरून देण्याची सक्ती करीत आहे. शाळा सुरू झाल्या असल्या तरी ऑनलाइन शिक्षणही सुरू ठेवायचे आहे. शाळांना याचा विसर पडलेला दिसतो. शिक्षण विभागाने पालकांच्या तक्रारींची दखल घेऊन ऑनलाइन शिक्षण न देणाऱया शाळांची चौकशी करून योग्य कारवाई करावी.
–
अॅड. अनुभा सहाय, अध्यक्ष, ऑल इंडिया पॅरेंटस् असोसिएशन

 शाळेच्या पहिल्या दिवशी स्कूलबस मिळणार नाही

1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी स्कूलबस उपलब्ध होणार नाही. स्कूल आणि कंपनी बस ओनर्स असोसिएशनने विद्यार्थी वाहतूकीस बस सज्ज करण्यासाठी 20 दिवसांचा वेळ जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी खासगी वाहन किंवा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्विकारावा लागेल.

गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने स्कूल बसेसही बंद आहेत. बसमालक, वाहक, महिला अटेंडटचा रोजगार कोरोनामुळे अचानक बंद झाला. पोट भरण्यासाठी या लोकांनी आता रोजगाराचे अन्य पर्याय स्वीकारले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी वाहतुकीसाठी बसमालक, वाहक वेळेत उपलब्ध होतील का, हे सांगणे कठीण असल्याचे स्कूल आणि कंपनी बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.