तिसऱया लाटेसाठी पालिका सज्ज, 4 जम्बो कोरोना सेंटर्स, मुलांसाठी स्वतंत्र विभाग जुलै अखेरीपर्यंत तयार

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेला यशस्वीपणे रोखल्यानंतर संभाव्य तिसऱया लाटेला रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली असून जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत 4 कोरोना जम्बो सेंटर्स उभारण्याचे काम टप्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून त्यात मुलांसाठी स्वतंत्र विभाग असून ते सर्व सुविधांनी सुसज्ज असणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी दिली. भायखळा, महालक्ष्मी, मालाड, कांजूरमार्ग येथे उभारण्यात येत असलेल्या कोरोना जम्बो सेंटर्सच्या कामाचा काकाणी यांनी आढावा घेतला. त्यातून 5500 बेड उपलब्ध होणार आहेत.

कोरोनाच्या तिसऱया संभाव्य लाटेला थोपवण्यासाठी मुंबई पालिका आणखी 4 जम्बो कोरोना सेंटर्स उभारत असून त्यासाठी पालिका कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी विभागवार दौरे करून तयारीचा आढावा घेतला असून कामे अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जम्बो सेंटर्समधील बेडची एकूण क्षमता 15 हजार 6567 इतकी आहे. यातील 70 टक्के बेड हे ऑक्सिजन बेड्स आहेत. प्रत्येक जम्बो कोरोना सेंटर्समध्ये द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू साठवण टाक्या उपलब्ध आहेत. प्राणवायू सिलिंडर्स बॅकअपसह विविध रुग्णालयांमध्ये हवेतून वैद्यकीय प्राणवायू उत्पादित करणारी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे प्राणवायूची अडचण भासणार नाही, असे काकाणी यांनी सांगितले. काकाणी यांनी मालाडमध्ये एमएमआरडीएमार्फत नव्याने उभारण्यात येणारे कोरोना केअर सेंटर, गोरेगाव कोरोना सेंटर, बीकेसी कोरोना सेंटर, दहिसर कोरोना सेंटर, कांजूरमार्ग कोरोना सेंटर येथे भेट दिली.

काय आहे सुविधा
पालिकेची रुग्णालये, जम्बो कोरोना सेंटर्स, कोरोना काळजी केंद्र 1 (सीसीसी 1) आणि 2 (सीसीसी 2) यामध्ये 2 हजार व्हेंटिलेटर्स बेड्स आहेत. जम्बो कोरोना सेंटर्समध्ये कांजूरमार्ग येथे 2 हजार 200, मालाड 2 हजार 200, शीव 1 हजार 200, वरळी रेसकोर्स 450, भायखळा येथील रिचर्डसन अॅण्ड क्रूडास 700, गोरेगाव नेस्को 1 हजार 500 तर वरळी एनएससीआय येथे 100 बेडची क्षमता वाढवण्यात आली आहे.

कोरोना झालेल्या गरोदर मातांसाठी स्वतंत्र कक्ष
कोरोना झालेल्या गरोदर मातांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून त्यांची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली आणि कोरोना रोखण्यासाठी लसीकरण वेगाने सुरू असले तरी सर्व मुंबईकर नागरिकांनी प्रतिबंधक नियमांचे योग्यरीत्या पालन केले पाहिजे. लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या